मुंबई : सदाभाऊ खोत, हॉटेलचं बिल आणि उधारी प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. यावर आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मोठा खुलासा केला आहे. उधारी प्रकरण राष्ट्रवादीचा बनाव असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्याचा प्लॅन केला होता, असं सदाभाऊ म्हणालेत. पुढे त्यांनी अख्ख्या प्लॅन उलगडला.
थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर राष्ट्रवादीने सदाभाऊंवर हल्ला केला, अशी नाचक्की होईल. म्हणून मग त्यांनी प्लॅनिंग केलं. हॉटेल मालकाने माझ्याजवळ यायचं हॉटेलचं बिल राहिलंय म्हणून बोलत राहायचं. त्यात जर माझ्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तर मग हल्ला करायचा असा राट्रवादीचा प्लॅन होता. पण त्यांचा प्लॅन सत्यात येऊ शकला नाही, असं म्हणत सदाभाऊंनी राष्ट्रवादीने आपल्यावर हल्ला करण्याचा प्लॅन केल्याचं सांगितलं.
सदाभाऊ खोत सध्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर त्याने 2014 मधील उधारीची मागणी सदाभाऊंकडे केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदाभाऊ चपापले. मात्र, त्यांनी वेळ मारुन नेत तुझं काय असेल तर बघू म्हणून तिथून काढता पाय घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाभाऊ खोत 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला उभे राहिले होते. त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा सांगोल्यातील मामा-भाचे या हॉटेलमध्ये करण्यात आली. सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी स्वतः येऊन हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना कार्यकर्त्यांना जेवण द्यावे अशी विनंती केली. त्यानुसार अशोक शिनगारे यांनी 15 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत कार्यकर्त्यांना जेवण दिलं. या 14 दिवसाच्या जेवणाचे एकूण बील 66 हजार 445 रुपये झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच बिलाची नोंद असलेलं एक रजिस्टरही शिनगारे यांनी दाखवलं.