सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना देहूमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नाही. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. सुळे यांच्या या टीकेला आता सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. ‘ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले की मला पहाटेचा शपथविधी आठवतो. मला ते दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासारखे दिसतात. त्यावेळी सुप्रिया सुळे झोपेत असतील. त्यामुळे पहाटेच्या शपथविधी झाला हे त्यांच्या लक्षात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं हे त्यांच्या लक्षात नाही. त्यामुळे ताई म्हणतात महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान झाला. पण काही झालं नाही. महाराष्ट्र खूशीत आहे’, असा टोला खोतांनी लगावलाय.
सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मला या लोकांचे हसू येते. काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा, बघु तुमची दानत आहे का? असा सवाल खोत यांनी केलाय. व्यासपीठावर फडणवीस आणि अजितदादा एकत्र होते. त्या दोघांना पाहिलं की मला पहाटेचा शपथविधी आठवतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होतं हे आठवतं. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा म्हणजे त्यांच्या लक्षात येईळ की प्रोटोकॉलप्रमाणे झालं की नाही, असा जोरदार टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावलाय.
खोत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या वारीवरही जोरदार टीका केलीय. सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवं. पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्या मंदिराच्या वर्गणीत भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि गोंधळ घातला. जे राम मंदिर बांधायची हिम्मत यांच्यात नाही असं म्हणाले. आता तेच अयोध्येला निघालेत. म्हणजे यांना रामाचा जपही करायचा आहे आणि काँग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे घेऊन नाचायचं आहे. एका म्यानात दोन तलवारी कशा राहतील? आता त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जा नाहीतर काशीला जाऊन अंघोळ करा. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात, अशी घणाघाती टीका खोत यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर केलीय.
शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाबाबतच्या उमेदवारीच्या चर्चेवरुन खोत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. संजय राऊतांचे अभिनंदन करेन की त्यांनी शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा असं म्हणाले नाहीत. पवारसाहेबांनी सांगितलं की ते उमेदवार नाहीत. गावगाड्यात म्हण आहे की ज्याचं त्याला कळेना आणि शेजाऱ्याला रात्रभर झोप येईना. संजय राऊत रात्रभरत जागे आहेत. ज्याचं त्याला कळेल काय करायचं, अशा शब्दात खोतांनी राऊतांवर निशाणा साधलाय.