रक्ताचं नातं पाठिशी, उद्धव ठाकरे राज यांच्यासोबत : संजय राऊत
कोहिनूर स्क्वेअर आर्थिक व्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चौकशी सुरु असताना त्यांच्या पाठिशी अनेक लोक उभे राहत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राज ठाकरेंची ही चौकशी एक परिक्षा आहे, त्यातून ते तावून सुलाखून निघतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : कोहिनूर स्क्वेअर आर्थिक व्यवहारप्रकरणी (Kohinoor Case) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चौकशी सुरु असताना त्यांच्या पाठिशी अनेक लोक उभे राहत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राज ठाकरेंची ही चौकशी एक परिक्षा आहे, त्यातून ते तावून सुलाखून निघतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच आपण या चौकशीकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
संजय राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी भाऊ म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या फार महत्वाच्या आहेत. राजकारण वेगळ्या बाजूला आहेत. राजकारणात मतभेद असू शकतात. पण जेव्हा कुटुंबाचा विषय येतो, तेव्हा कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रत्येकजण आपआपल्या भूमिका पार पाडत असतो. हे ठाकरे कुटुंबात अनेकदा पाहिला मिळालं आहे. राज ठाकरे शिवसेनेत असताना देखील त्यांच्यावर काही प्रकरणांमध्ये दोषारोप झाले होते. त्यावेळी सीबीआयने (CBI) त्यांना चौकशीला बोलावले होते. तेव्हा उद्धव ठाकेर, मी आणि इतर काही नेते त्यांच्यासोबत सीबीआय कार्यालयापर्यंत गेलो होतो.’
‘उद्धव ठाकरेंना ओळखणाऱ्यांना त्यांची संवेदनशीलता माहिती आहे’
ही रक्ताची नाती असतात, मैत्रीची नाती असतात. महाराष्ट्रात विशेषतः आपल्या मराठी कुटुंबांमध्ये ही नाती आपण जपत असतो. उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात, त्यांना ते किती संवेदनशील मुलगा, भाऊ आणि नेते आहेत हे माहिती आहे. म्हणूनच ते कोणत्याही विषयावर टोकाची प्रतिक्रिया देत नाही. या प्रकरणातून काहीही निष्पण्ण होणार नाही आणि राज ठाकरे यातून बाहेर पडतील असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. या दोन ओळीतून उद्धव ठाकरेंना काय सांगायचं आहे आणि काय त्यांच्या काय भावना आहेत हे स्पष्ट दिसतं, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
अंजली दमानियांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर
राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील ईडी कार्यालयाकडे गेल्याने अंजली दमानिया यांनी ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का? असा प्रश्न करत टीका केली होती. तसेच हा सहानुभूती गोळा करण्याचा प्रकार असल्याचाही आरोप गेला होता. त्याला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “ही सत्यनारायणाची पूजा आहे की श्रावणातील या नसत्या उठाठेवी इतर कुणी करु नये. अशा प्रसंगात कुटुंबाने प्रमुख माणसाला आधार द्यायचा असतो. राजकीय कार्यकर्ते असतातच, पण कुटुंबाचा आधार महत्त्वाचा असतो. म्हणूनच कुटुंबातील प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना आधार दिला.”
‘कुटुंब सोबत गेल्याने टीका करणं चांगल्या संस्काराचं लक्षण नाही’
अशाप्रसंगी कुटुंब सोबत गेल्याने त्यावर टीका करणं चांगल्या संस्काराचं लक्षण नसल्याचंही राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले, ‘ज्यांना कुटुंबाविषयी जान आहे, संवेदना जोपासायच्या आहेत, तेच कुटुंबाविषयी बोलतात. कुटुंबावर टीका करणं हे हीन दर्जाचं लक्षण आहे.’
‘चिदंबरम यांच्या अटकेबाबत काहीही वाटत नाही’
संजय राऊत यांनी चिदंबरम यांच्या अटकेवरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘चिदंबरम यांच्या अटकेबाबत काहीही वाटत नाही. अशा घटना देशात याआधीही झाल्या आहेत. तपास संस्थांच्या अशा कारवाया नव्या नाहीत. जर आपल्याकडून काही गुन्हा झाला नसेल, तर बेडरपणे त्याला सामोरं जाणं हा एकमेव मार्ग आहे.’
‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही यातून जावं लागलं’
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनासुद्धा या प्रक्रियेतून जावं लागलं होतं याचीही आठवण राऊत यांनी करुन दिली. या अग्निपरिक्षेला सामोरे गेल्यानंतर ते आज देशाच्या सर्वोच्चपदी पोहोचल्याचं संजय राऊत यांनी नमूद केलं.
‘हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार’
संजय राऊत म्हणाले, ‘वैयक्तिक मित्र म्हणून राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरेंच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्याही आहेत. राजकारणात आम्ही सतत एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत, पण संकट काळात परिवार एक असतो. मतभेदांची जळमटं गळून पडतात हे उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत.’