उस्मानाबादः औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराचा मुद्दा चांगलाच पेट घेत आहे. औरंगाबादेत नामांतर विरोधी समिती कायदेशीर मार्गाने लढा देण्याच्या तयारीत असतानाच समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी (Abu Azmi) उद्या उस्मानाबादेत येणार आहेत. 23 जुलै रोजी शनिवारी उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर शिंदे भाजप सरकारने घेतला आहे. या आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय अवैध असल्याचे सांगत एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा एकदा या नामांतरावर शिक्कामोर्तब केलेय. मात्र नामांतर विरोधी राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या नामांतराला विरोध करण्यासाठी आजमी हे उस्मानाबाद येणार आहेत. आजमी यांनी याबाबत फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करुन माहिती दिली आहे.
उस्मानाबादेत अबू आझमी हे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्गाह येथे दुपारी 2 वाजता पोहोचतील. दुपारी 3 वाजता एस आर फंक्शन हॉल येथे उस्मानाबाद नामांतरण विरोधी समितीची बैठक घेतील व त्यानंतर 5 वाजता जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देतील. त्यानंतर ते रात्री 7 वाजता सोलापूर येथे कार्यकर्ता बैठक घेतील.
आजमी हे महाविकास आघाडी सरकार सोबत होते. मात्र नामांतराचा निर्णय झाल्यावर ते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या महाविकास आघाडीवर नाराज झाले. सत्तातरणच्या वादावेळी व बहुमत चाचणी वेळी आजमी यांनी तटस्थपणाची भूमिका घेतली होती. ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानंतर शिंदे सरकारने नामांतराचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मुस्लिम समाजातून तसेच काही राजकीय पक्षाकडून विरोध होत आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी यांनी राजीनामाही दिला आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा निर्णय झाल्यानंतर अबू आझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या निर्णयाचा निषेध केला होता.
पुराने शहरों का नाम बदलने से क्या होगा?
नया शहर बसाओ तो कोई बात बने।मुसलमानों के नाम से इतनी नफरत क्यों?#Maharashtra pic.twitter.com/vceCHVUCu6
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) July 3, 2022
दरम्यान, राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतरही औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अद्याप केंद्र सरकारने मंजुरी दिलेली नाही. त्या आधीच गूगल मॅपवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नामांतरविरोधी संघटना प्रचंड संतापल्या आहेत. गूगलविरोधात तक्रार करण्यासाठी समितीतील सदस्य एकवटले आहेत. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबादेतील नामांतराचा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्ह आहेत