“राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायेत”
राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) मनोज आखरे यांनी केलाय. जिथं जिथं खोटा इतिहास सांगितला गेला,तिथं राज ठाकरेंनी समर्थन दिलं आहे, असंही आखरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुपारी घेऊन काम करतात, असाही आरोप आखरे यांनी केलाय.
राज ठाकरेंनी चित्रपटाला समर्थन दिलं खोटा इतिहास पसरवण्याची सुपारी घेतली आहे का? खोटा इतिहास दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीशी राज ठाकरे का उभे राहतात? असा सवाल मनोज आखरे यांनी केलाय.
राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेऊन हर हर महादेव चित्रपट बाहेर आणला आणि महाराष्ट्र अशांत करण्याचं काम केलं. जो इतिहास घडला नाही तो इतिहास दाखवायचा सध्या काही लोक प्रयत्न करत आहेत. विश्वासू सरदारांची बदनामी करण्याचं काम केलं. खोटा इतिहास दाखवला जातो तेव्हा फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे समर्थन करतात. हे कोणत्या मानसिकतेतून हे करतात, असंही आखरे म्हणालेत.
भांडारकरवर हल्ला झाला. तेव्हा राज ठाकरे बहुलकरच्या पाया पडतात. ज्या बहुलकरनं जेम्स लैनला मदत केली. इतिहासाचे चित्रपट मालमसाला लावून दाखवला जाऊ नये.आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी ब्रिगेडची बैठक आयोजित केली आहे, असंही आखरे म्हणाले आहेत.