लातूर : लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी राज्यात विधानसभेला प्रचंड मोठ्या फिक्सिंगचा गौप्यस्फोट केलाय. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सुचित केलंय. म्हणजेच फडणवीस, ठाकरे, देशमुख यांनी एकत्रित येऊन राजकीय फिक्सिंग केल्याचं त्यांनी उघडपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. (Sambhaji Patil Nilangekar hints at Political Fixing in Latur Rural Vidhansabha Election)
लातूर ग्रामीणची जागा परंपरागतपणे भाजप लढवतं. पण गेल्या विधानसभेला ती जागा भाजपानं सोडली आणि औशाची जागा स्वत:साठी घेतली. औशातून देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार उभे राहिले आणि निवडूनही आले. त्यांनी काँग्रेसचे त्यावेळेचे आमदार बस्वराज पाटील यांचा पराभव केला. औशाची जागा परंपरागतपणे शिवसेना लढवते. दिनकर माने हे तिथं शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुखांचे पुत्र आणि मंत्री अमित देशमुखांचे बंधू धीरज देशमुख यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेने सचिन देशमुख हा फारसे परिचित नसलेला उमेदवार दिला. परिणामी लातुरात धीरज देशमुख विरुद्ध नोटा अशी लढत झाली. देशातली कदाचित ही एकमेव लढत असावी जिथं मुख्य उमेदवार विरुद्ध नोटा अशी लढत झाली असावी.
लातूर ग्रामीणमधून 2014 साली पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड हे थोड्या फरकाने पडले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण फडणवीसांच्या पीए राहिलेल्या अभिमन्यू पवार यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी औशाची निवड केली. पण तो मतदारसंघ तर सेनेकडे होता. भाजपने मग पंकजा मुंडे समर्थक उमेदवाराचा मतदारसंघ फडणवीसांच्या पीएसाठी देऊन टाकला. परिणामी भाजपाच्या त्या एका निर्णयाने पंकजा मुंडेंनाही शह बसला.
काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख निवडून यावेत म्हणून शिवसेनेनं फिक्सिंग केल्याचा थेट आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय. त्यासाठी फारशी ओळख नसलेला उमेदवारही दिला आणि हे सगळं वरळीसाठी सेनेनं सेटिंग केली असंही पाटलांचं म्हणणं आहे. वरळीतून आदित्य ठाकरे शिवसेनेकडून निवडून आलेत हे लक्षात असावं.
लातूर ग्रामीण आधी भाजपने सोडला, नंतर तिथे शिवसेनेने दुबळा उमेदवार दिला. परिणामी अमित देशमुखांचे बंधू धीरज निवडून आले. पण त्या बदल्यात अमित देशमुखांनी काय केलं? तर त्याचं उत्तर आहे औसा. तिथे फडणवीसांचे पीए अभिमन्यू पवारांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुखांनी मदत केल्याची त्यावेळेसही उघड चर्चा होती आणि आता संभाजी पाटलांनीही ते सुचित केलंय. म्हणजे स्वत:च्या भावाच्या विजयासाठी अमित देशमुखांनी काँग्रेसचे त्यावेळेसचे आमदार आणि शिवराज पाटील चाकुरकरांचे मानसपुत्र बस्वराज पाटील यांचा पराभव करण्यात मदत केली. म्हणजे फडणवीसांच्या पीएसाठी इथं फिक्सिंग झाली असं तर संभाजी पाटलांना सुचवायचं नाहीय? (Sambhaji Patil Nilangekar hints at Political Fixing in Latur Rural Vidhansabha Election)
रमेश कराड भाजप सोडणार होते, तेव्हाच…
2014 मध्ये रमेश कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजप उमेदवार होते. त्यांना 93 हजार मतं मिळाली होती. अवघ्या सात ते आठ हजार मतांनी त्यांची जागा गेली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची युती होती. कराड यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात असताना शिवसेनेने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला. अखेर युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजप सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यास सांगितलं, कराड पक्षप्रवेश करणार त्याचवेळी सचिन देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या विरोधात आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पंचायती भाजपकडे आहेत. मग शिवसेनेने त्याच जागेचा आग्रह का केला, असा सवाल संभाजी पाटील निलंगेकरांनी उपस्थित केला. हा मुद्दा वर येण्याचं कारण म्हणजे साडेतीनशे शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही ज्या पक्षासाठी जीवापाड काम केलं, त्यांनी दगा केला. न लढता फिक्सिंग करणं हा लोकशाहीचा खून आहे. तुम्ही एकदा जिंकाल, पण हे सतत होणार नाही, जनता याचं उत्तर देईल, असा इशाराही संभाजी पाटील निलंगेकरांनी दिला.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
(Sambhaji Patil Nilangekar hints at Political Fixing in Latur Rural Vidhansabha Election)