Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे माघार घेणार? उद्या पत्रकार परिषद, मन मोकळं करणार

| Updated on: May 26, 2022 | 4:44 PM

संभाजीराजे यांना आता राज्यसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी उद्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यावेळी ते मन मोकळं करु शकतात. त्यामुळे संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sambhajiraje Chhatrapati : राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे माघार घेणार? उद्या पत्रकार परिषद, मन मोकळं करणार
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारीवरुन राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं दोन उमेदवार दिल्यानं अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली असताना आता त्यांना माघार घ्यावी लागणार का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचं आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेनं कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भूमिका बदलत शिवसेनेच्याच उमेदवाराला राष्ट्रवादीची शिल्लक राहणारी मतं दिली जातील असं जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजे यांना आता माघार घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी उद्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यावेळी ते मन मोकळं करु शकतात. त्यामुळे संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संभाजीराजे छत्रपती उद्या (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

संभाजीराजे शिवरायांसमोर नतमस्तक

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले आहेत. ‘महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचं आहे. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ असं ट्वीट करत संभाजीराजे यांनी एकप्रकारे आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे संभाजीराजे राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपलं कार्य पुढे नेण्याच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपही तिसरा उमेदवार देणार?

दरम्यान, भाजपनेही संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देणार की नाही हे स्पष्ट केलंलं नाही. त्यात महाराष्ट्र भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यासाठीही उत्सुक असल्याचा सुतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 10 मतं कमी पडताहेत, मात्र आमची मार्केटमध्ये इतकी पत आहे की, 10 मतं आम्हाला आपोआप मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती जर उभे राहात असतील तर त्यांना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून लढत मिळण्याची शक्यता आहे.