शिवभक्तांचे 23 कोटी रुपये दलालीसाठी द्यायचे का? : संभाजीराजे छत्रपती
राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (29 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रायगड किल्ल्याच्या विकासापासून अनेक विषयांवर चर्चा केली (Sambhajiraje Chhatrapati meet CM Uddhav Thackeray).
मुंबई : राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (29 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रायगड किल्ल्याच्या विकासापासून अनेक विषयांवर चर्चा केली (Sambhajiraje Chhatrapati meet CM Uddhav Thackeray). यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगड विकास निधी आणि मागील दोन वर्षांतील कामाचा वेग याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच राजगडसाठी मंजूर झालेले शिवभक्तांचे 23 कोटी रुपये दलाली द्यायची का असा प्रश्नही उपस्थित केला.
खासदार संभाजी छत्रपती म्हणाले, “मागील वेळी सरकारने रायगड संवर्धनासाठी 706 कोटी रुपये दिले. रायगड ही शिवाजी महाराजांनची राजधानी आहे. मात्र, याच राजधानीच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन 2 वर्षे झाले, तरीही गडाचे काम 1 टक्काही झाले नाही. या कामासाठी 16.50 टक्के कमिशन दिले जाणार आहे. म्हणजेच शिवभक्तांचे 23 कोटी रुपये दलालीसाठी (कमिशन) द्यायचे का?”
माझ्यासाठी महाराजांपेक्षा कोणीही मोठा नाही. म्हणूनच या कामात काहीही चूक व्हायला नको. त्यांचा वंशज म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी आधीपासून याबाबत आवाज उठवला आहे. आज मुख्यमंत्र्यांना भेटून मी माझी अस्वस्था त्यांना सांगितली. तसेच असं काम होणार असेल तर मला या जबाबदारीमधून मुक्त करा, अशी मागणी केल्याचीही माहिती संभाजीराजे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संवर्धनाचं काम तुम्हीच करा. हे काम तुमच्याशिवाय दुसरं कुणी करू शकणार नाही, असं सांगितलं. तसेच जे लोक भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत त्यांना पहिल्याच आठवड्यात बोलावून विचारणा करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही संभाजीराजेंनी दिली.
“मराठा आरक्षणाच्या खटल्यातील वकील बदलणार नाही”
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्यावतीने लढणार वकील बदलले जाणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरेंनी संभाजीराजेंना दिलं. यावेळी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांवर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देणे संभाजीराजेंनी टाळले. मी यावर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कर्जमाफीवर राजकीय बोलणार नाही. पण गरीब बापड्या शेतकऱ्याला कर्जमाफीतून न्याय मिळाला पाहिजे अशा माझी भावना असल्याचं ते म्हणाले.