उद्धव ठाकरे आणि मोदींना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हालचाली
मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूनच युतीचा मार्ग तयार होणार असल्याचं बोललं जातंय. समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि […]
मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातूनच युतीचा मार्ग तयार होणार असल्याचं बोललं जातंय. समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या महामार्गाचे भूमीपूजन नागपूर येथे होणार असून त्यासाठी उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी अजून तरी सरकार किंवा भाजपाकडून संपर्क झाला नसला, तरी लवकरच त्यांनाही निमंत्रण दिले जाईल, असंही सांगण्यात येतंय. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे आता शासकीय पातळीवरही हालचाली सुरु आहेत.
शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी भाजपकडून मात्र युतीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे आणखी एक पाऊल टाकत उद्धव ठाकरे आणि मोदींना एका व्यासपीठावर आणण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा जिंकल्या. पण यावेळी युतीचा मार्ग खडतर असल्याचं दिसतंय. युतीची चर्चा थांबल्याची माहितीही यापूर्वीच समोर आली होती. शिवसेना युतीसाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातंय. पण आता वरिष्ठ पातळीवर यासाठी हालचाल सुरु झाली आहे.