सभांच्या खर्चाचं आमचं आम्ही बघू, आशिष शेलारांनी चोमडेपणा करु नये : संदीप देशपांडे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ए लाव रे तो व्हिडीओ या एकाच वाक्याने सत्ताधाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. राज ठाकरे यांनी प्रचारासाठी वापरलेल्या रिमाईंडर पॉलिसी पॅटर्नने केवळ राज्यातच नाही तर देशात धुमाकूळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांपासून देशाला वाचवा हा एकच अजेंडा घेऊन राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी 10 […]
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ए लाव रे तो व्हिडीओ या एकाच वाक्याने सत्ताधाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. राज ठाकरे यांनी प्रचारासाठी वापरलेल्या रिमाईंडर पॉलिसी पॅटर्नने केवळ राज्यातच नाही तर देशात धुमाकूळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांपासून देशाला वाचवा हा एकच अजेंडा घेऊन राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी 10 सभा घेतल्या. राज यांनी आपलं भाषण आणि पुराव्यानिशी प्रेझेंटेशनने प्रचाराचा फंडाच बदलून टाकला. मात्र एकही उमेदवार नसलेल्या मनसेला आता या सगळ्या सभांचा हिशोब द्यावा लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे चारही टप्पे पार पडले. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी रेकॉर्डब्रेक सभांचा धडाका लावला होता. मात्र या सगळ्या प्रचारसभांपैकी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांची केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसताना, राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचार सभांच्या खर्चाचा हिशेब मनसेला द्यावा लागणार आहे. “भाजपने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. त्यामुळे मनसेने लोकशाहीप्रमाणे आपलं काम करावं असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं.
“दुसरीकडे मनसेने ज्या प्रचारसभा घेतल्या आहेत, त्याचा सविस्तर खर्च आमच्याकडे आहे. आम्ही तो आमच्या पक्षाच्या खात्यातून केला असून, जेव्हा कुणी आम्हाला खर्च मागेल, तेव्हा आम्ही तो देऊ. मात्र अजून तरी निवडणूक आयोगाने आम्हाला अशी कोणतीही नोटीस दिलेली नाही”, असं मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
आशिष शेलार कोण आहेत, त्यांनी आमच्या आणि निवडणूक आयोगामध्ये चोमडेपणा करु नये, भाजपनं आम्हाला लोकशाही शिकवू नये, मुळात निकाल लागल्यानंतर 90 दिवसाच्या आत खर्च देण्याची मुदत आहे, असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी केला.
राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रत्येकी 75 पेक्षा जास्त सभा घेतल्या. तर दुसरीकडे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांनीही राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. मात्र या सगळ्यांच्या सभाचा आकडा बघितला तर तो जवळपास पन्नाशीच्या पुढचाच असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त दहाच सभा घेऊनही, याचीच सर्वाधिक चर्चा अजूनही सुरु आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे महाआघाडीला जरी मोठा फायदा झाला असला, तरी राज ठाकरे यांच्या सभेशी किंवा त्याबद्दलच्या खर्चाशी दोन्ही पण पक्ष दोन हात लांबच राहणं पसंत करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या रिमाईंडर पॉलिसी पॅटर्नमुळे, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला मात्र चांगलाच त्रास झाला. म्हणूनच सुरुवातीला अदखलपात्र मानलेल्या राज ठाकरे यांची गंभीर दखल दोन्ही पक्षांना घ्यावी लागली होती.