Breaking News | संदीप देशपांडे यांचा हल्लेखोर ठाकरे गटाचा पदाधिकारी? राजकीय हेतुनेच हल्ल्याचा दाट संशय, मोठी माहिती समोर!
Sandeep Deshpande news update | संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी महत्त्वाची माहिती हाती आली आहे.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती ठाकरे गटाची असल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळीच पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर मोठी माहिती समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेला हल्ला हा राजकीय हेतुनेच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून आता या गोष्टीला दुजोरा मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहे आरोपी?
पोलिसांनी या प्रकरणी आज भांडुप परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं. यापैकी एकाची ओळख पटली आहे. एकाचं नाव अशोख खरात आहे. तो शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माथाडी संघटनेचा उपाध्यक्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा भांडुप परिसरातील कोकण नगरात राहतो. त्याच्याबरोबर सोळंखी नावाचा आणखी एक सहकारी होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
नेमका कुणाचा हात?
हा हल्ला राजकीय हेतुनेच झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ला प्रकरणी पकडण्यात आलेली व्यक्ती ठाकरे गटाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे. काल भाजप आणि मनसे नेत्यांनीही ही भीती व्यक्त केली होती. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करीत आहेत.
कधी झाला हल्ला?
शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क मैदानावर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सकाळी सात वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांकडे स्टँप आणि रॉड होते. मात्र संदीप देशपांडे यांनी वेळीच समयसूचकता दाखवत प्रतिकार केला, आरडाओरड केली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. मात्र या झटापटीत संदीप देशपांडे यांना हात आणि पायाला इजा झाली. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
संदीप देशपांडे यांचा कुणावर संशय?
संदीप देशपांडे यांनी आज प्रथमच माध्यमांसमोर सविस्तर प्रतिक्रिया दिली. हल्ला नेमका कसा झाला, हे सविस्तर सांगितलं. तसेच त्यांना नेमका कुणावर संशय आहे, याची सविस्तर माहिती पोलिसांना दिल्याचंही ते म्हणाले. संदीप देशपांडे यांनी काही सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कोविडच्या संदर्भात एक तक्रार केली होती. इकोनॉमिक ऑफेन्सविंगने बाळा कदम यांना अटक केली होती. त्यानंतर ४८ तासात ही घटना घडली…