Sandeep Deshpande : ‘शरद पवार महाराष्ट्राची माफी मागा’, मनसेची मागणी; तर ‘तुम्हालाच अनेकवेळा माफी मागावी लागेल’, गृहमंत्र्यांचा पलटवार
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरेंचं एक पत्र समोर आणत शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पलटवार करत त्यांनाच अनेकवेळा माफी मागावी लागेल, असं म्हटलंय.
मुंबई : राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं, असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. त्यावर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात जिजाऊंपेक्षा दादोजी कोंडदेव यांचे योगदान जास्त होते, असं वक्तव्य केलं होतं. त्याला माझा विरोध होता, असं शरद पवार म्हणाले. त्यावर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी बाबासाहेब पुरंदरेंचं एक पत्र समोर आणत शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पलटवार करत त्यांनाच अनेकवेळा माफी मागावी लागेल, असं म्हटलंय.
पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी – देशपांडे
संदीप देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेलं एक पत्र समोर आणलंय. हे पत्र आपल्याला एका शिवप्रेमीने दिल्याचं देशपांडे यांनी सांगितलं. त्या पत्रातील मजकूरही त्यांनी वाचून दाखवला. देशपांडे यांनी समोर आणलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्रात ‘ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेननं जे विधान केलंय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी 25 नोव्हेंबर 2003 पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावं. जर प्रकाशक आणि लेखकानं असं काही केलं नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करु’, असं लिहिण्यात आल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
दिलीप वळसे पाटलांचा पलटवार
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या मागणीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. मनसेला अशा प्रकारची माफी अनेकवेळा मागावी लागेल. शरद पवारांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं वळसे पाटील म्हणाले.
राज ठाकरेंच्या टीकेला पवारांनी काय उत्तर दिलं होतं?
जेम्स लेननं केलेल्या गलिच्छ लिखाणाला माहिती देण्याचं काम बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्यानंतर आता बाबासाहेब पुरंदरे यांचं पत्र संदीप देशपांडे यांनी समोर आणलं आहे.
इतर बातम्या :