मनसेच्या मोर्चात भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही सहभागी होणार : संदीप देशपांडे
राज ठाकरे आज जी राजकीय भूमिका मांडतील, ती मनसेची पुढची दिशा ठरवणारी असेल, असं मतही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं.
मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात मनसेने पुकारलेल्या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी (Sandeep Deshpande MNS Morcha) केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गिरगावातील हिंदू जिमखान्यापासून दुपारी बारा वाजता मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल.
‘बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना या देशातून ‘चले जाव’ असा इशारा देणारा राज ठाकरेंचा मोर्चा आहे. या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते, देशप्रेमी जनता सहभागी होईल. त्यामुळे वेगळं कोण कोण सहभागी होईल, असं सांगणं चुकीचे ठरेल’ अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
राज ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुुप्त भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. गेल्या काही दिवसात भाजप नेत्यांकडून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेचं स्वागत होताना दिसत आहे. त्यातच मनसेच्या मोर्चात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याने मनसे-भाजप जवळीकीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
दरम्यान, राज ठाकरे आज जी राजकीय भूमिका मांडतील, ती मनसेची पुढची दिशा ठरवणारी असेल, असं मतही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता हिंदू जिमखान्यापासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर आझाद मैदानावर पोहचल्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी सभेला संबोधित करतील. राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
आदर्श मोर्चा , संयमाची चर्चा
सर्व महाराष्ट्र सैनिकांनी खालील गोष्टी नक्की अंमलात आणाव्यात. मनसे सैनिकांनो आपले आजवर झालेले मोर्चे हे आदर्श असेच राहिले, तिच पुनरावृत्ती आपणास उद्या ही करायची आहे हे लक्षात ठेवा ….संयम, शिस्त ह्या गोष्टी उद्या मनसेच्या मोर्च्याची शान ठरणार आहे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 8, 2020
मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अगदी ‘मातोश्री’समोरही मनसेने पोस्टरबाजी केली होती. सोशल मीडियातूनही मनसेने मोर्चासाठी चांगलीच ‘मोर्चेबांधणी’ केली आहे.
मोर्चासाठी दोन ते तीन लाख जण येण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.
आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.
(Sandeep Deshpande MNS Morcha)