“माझ्या दादाहो-ताईहो, मला तुम्हाला विचारायचंय…”, सुषमा अंधारेंची नक्कल कुणी अन् का केली?
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आलीये. पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. त्यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सुषमा अंधारेंच्या स्वरात “माझ्या दादाहो-ताईहो, मला तुम्हाला विचारायचंय…” , हे वाक्य म्हटलं अन् उपस्थितांनी त्याला दाद दिली.
माझ्या दादाहो-ताईहो, आम्हाला तुम्हाला विचारायचंय… आम्ही भरत असलेल्या टॅक्सचा आम्हाला काय मोबदला मिळाला? ताईहो… तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आणखी कुणावर केली पण आमचं काय?”, असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय.
25 वर्षे शिवसेना महापालिकेत सत्तेत होती. या 25 वर्षात अनधिकृत बांधकामं झाली. रस्ते झाले नाहीत. पावसाळ्यात थोडा पाऊस झाला की मुंबईची तुंबई होते. मग आम्हा सर्वसामान्य लोकांना काय दिलंत?, असाही सवाल संदीप देशपांडेनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशात मनसेही आक्रमकपद्धतीने मैदानात उतरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी सुषमा अंधारे अन् आदित्य ठाकरेंवर घणाघात केलाय.
आदित्य ठाकरेंची मिमिक्री
अरे बाबा मुंबई महापालिकेत सत्तेत होतात तुम्ही, आमच्या रस्त्यांचं काय? ‘नाही, आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी’, असं म्हणताना देशपांडेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाज काढला. आम्ही प्रश्न विचारतो, आमचे हॉस्पिटल कधी चांगले होणार? ‘नाही ते, 50 खोके घेतले त्यांनी’, असं म्हणत संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली.
ठाकरेगटाला सवाल
त्यांनी खंजीर खुपसलं. मग तुम्ही पाठ का उघडी ठेवली? अरे पण या सगळ्याशी आम्हाला काय देणं घेणं? तुम्ही आमच्या प्रश्नांवर बोला. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. त्यांच्या समस्यांचं काय त्या कधी सोडवणार? असं म्हणत संदीप देशपांडेंनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे.
मुंबई महापालिकेने 2 कोटी रूपये टॅक्सच्या रुपाने मुंबईकरांकडून जमा केले त्या बदल्यात नागरिकांना कुठल्या सोयी-सुविधा दिल्या ते जास्त महत्वाचं आहे, असंही देशपांडे म्हणालेत.