Sandeep Deshpande News | संदीप देशपांडे यांनी कुणाला म्हटलं एका दिवसाची नर्स? काय आहेत आरोप?
एक दिवसाची नर्स होणं म्हणजे नौटंकी, मानेला पट्टा बांधून सहानुभूती गोळा करणं म्हणजे नौटंकी, अशा खोचक शब्दात संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
मुंबई : एका दिवसाची नर्स होणं म्हणजे नौटंकी, मानेला पट्टा बांधून सहानुभूती मिळवणं म्हणजे नौटंकी अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीका केली आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या (Shivsena) फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांच्यावर देशपांडे यांनी ही खोचक टीका केली आहे. किशोरी पेडणेकर या राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी नर्स होत्या. त्यांनी मुंबईच्या रुग्णालयात सेवादेखील केली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. आरोग्य यंत्रणेवर आधीच जास्त तणाव आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची अचानक भेट घेतली. यावेळी त्या नर्सच्या वेशात आल्या आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी किशोरी पेडणकरांच्या या भेटीवरून खोचक टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांचं ट्विट व्हायरल
संदीप देशपांडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्या या दौऱ्यावर खोचक टीका करत ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलय, एक दिवसाची नर्स होणं म्हणजे नौटंकी, मानेला पट्टा बांधून सहानुभूती गोळा करणं म्हणजे नौटंकी. कर्तृत्वशून्य माणसाला सहानुभूतीची गरज असते, आम्हाला नाही. असो. गरीबांचे SRA मधील सदनिका चोरणाऱ्यांना ही अक्कल कशी येणार…. असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.
एक दिवसाची नर्स होणं म्हणजे नौटंकी ,मानेला पट्टा बांधून सहानभूती गोळा करण म्हणजे नौटंकी.कर्तृत्व शून्य माणसाला सहानुभूतीची गरज असते आम्हाला नाही.असो गरिबांचे SRA मधील सदनिका चोरण्यार्यांना ही अक्कल कशी येणार ???? pic.twitter.com/Iv7TtBPulh
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 8, 2023
आदित्य ठाकरेंकडून कौतुक
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी किशोरी पेडणकर यांच्या या हॉस्पिटलभेटीचं कौतुक केलं. मुंबईच्या महापौर किशोरीताई स्वतः नर्स म्हणून नायर हॉस्पिटलमध्ये सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई कोरोनाविरुद्ध लढणार आणि जिंकणारच, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय.
कोरोनाविरुद्ध लढणार आणि जिंकणारच! मुंबईच्या महापौर @KishoriPednekar ताई स्वतः नर्स म्हणून नायर हॉस्पिटलमध्ये सेवेत रुजू झाल्या आहेत. pic.twitter.com/QzWNuaXC2Z
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 27, 2020
कोण आहेत किशोरी पेडणेकर?
राजकारणात येण्यापूर्वी किशोरी पेडणेकर या मुंबईतील रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. रुग्णांची सेवा करतानाच त्यांनी समाजसेवेचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत प्रवेश केला. किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापालिकेच्या माजी महापौर आहे. सध्या महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक राज आहे. उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंत, कट्टर शिवसैनिक आणि फायरब्रँड महिला नेत्या अशी त्यांची ख्याती आहे. २००२ मध्ये त्यांनी सर्वप्रथम वरळीतून शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. त्यात विजयी झाल्या आणि बीएमसीत प्रवेश केला. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी त्या मुंबईच्या महापौर झाल्या. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या त्या निकटवर्तीय आहेत. गेल्या २५ वर्षांपासून बीएमसीवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या विविध समित्यांमध्येही किशोरी पेडणेकर यांचं मोलाचं योगदान आहे.