शिवसेनेने जे पेरलं तेच उगवत आहे; माझ्यावरही…, प्रभादेवीतल्या राड्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
मुंबईच्या प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिक आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे देखील पहायला मिळाले. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुंबईच्या (Mumbai) प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिक (Shivsena) आपसात भिडल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे देखील पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता 25 शिवसैनिकांवर दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत हा काय बिहार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हटलं संदीप देशपांडे यांनी?
दादर, प्रभादेवी, माहीम हे सुसंस्कृत मतदासंघ आहेत. अशा हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य नाही. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. शिवसेनेने अडीच वर्षांत जे पेरलं तेच आता उगवत असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसे आंदोलनाच्यावेळी माझ्यावरही पोलीस भगिनीला धक्का मारल्याचा खोटा आरोप करून केस दाखल करण्यात आली होती, असंही यावेळी देशपांडे यांननी म्हटलं आहे.
‘लोकांना खोट्या केसमध्ये अडकवलं’
तुम्ही लोकांवर खोट्या केस टाकल्या त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावरही खोटी केस झाली. शिवसेनेने अडीच वर्षात जे पेरलं तेच आता उगवत असल्याचा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 25 शिवसैनिकांवर दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.