कोण खैरै? त्यांना कोण ओळखतं, त्यांनी आता.., नातवंडांचा उल्लेख करून भुमरेंनी डिवचलं, म्हणाले…
जिल्ह्यात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खासदार संदिपान भुमरे यांनी जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खासदार संदिपान भुमरे यांनी जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. खैरे यांना आता कोणीही विचारत नाही. त्यांनी घरी बसून नातवंडे सांभाळावीत असं त्यांनी म्हटलंय. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराला लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे, त्यामुळे या कामाचं श्रेय घेण्यासाठाची आदित्य ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष आंदोलन करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे यांच्या काळात योजना…
“छत्रपती संभाजीनगर शहराला लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. याचं श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांची शिवसेना आंदोलन करत आहे. चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे होते. त्यांनी लक्ष घातले नाही, त्यामुळे पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात योजना पूर्ण झाली नाही म्हणून लोकांचे हाल झाले,” असा आरोपही संदिपान भुमरे यांनी केला.
चंद्रकांत खैरे हा ढोंगी माणूस आहे
तसेच, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरठवा करणाऱ्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. चंद्रकांत खैरे हा ढोंगी माणूस आहे. खैरे यांनी सगळ्या योजनेचा बट्ट्याबोळ केला. खैरे यांच्यामुळेच शहराला पाणी मिळाले नाही. खैरे यांनी आता त्यांची नातवंडं सांभाळावीत, अशी घणाघाती टाकाही भूमरे यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही फाईली अडवल्या जात नाहीत
“एकनाथ शिंदे यांना दिल्ली दरबारी खूप मानलं जातं. संजय राऊत यांना काही काम नाही. संजय राऊत यांच्यासारखे अनेकजण शिंदे साहेबांनी वाटेला लावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कुठल्याही फाईली अडवल्या जात नाहीत,” असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. तसेच माझ्या पाच वर्षांच्या काळात मी एकही गाव वाडी वस्ती वर जायचं सोडणार नाही. मी सगळीकडे फिरणार आहे, असे आश्वासन भुमरे यांनी दिले.
पैठणचा 80 टक्के भाग सुजलाम सुफलाम होईल
“पूर्वीचा खासदार 20 वर्षात गावागावात गेला नाही. मला कुठलाही राजकीय वारसा नाही. पण जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. माझा मुलगा आमदार झाला. पैठणला जायकवाडी धरण आहे. वारंवार म्हणायचे धरण उशाला कोरड घशाला. पण सगळीकडे पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे. पैठणचा 80 टक्के भाग सुजलाम सुफलाम होईल,” असे भाकितही त्यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी जिल्ह्याची वाट लावली
संदिपान भुमरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरदेखील टीका केली आहे. अंबादास दानवे यांना आम्ही दाखवून दिले. त्यांचा जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेते आहेत. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी जिल्ह्याची वाट लावली. आता या जिल्ह्यात ठाकरे यांच्या पक्षात खैरे आणि दानवे हे दोघेच राहणार आहेत आणि वरदेखील ते बाप-लोक दोघेच राहणार आहेत, अशी मिश्किल टिप्पणीदेखील भुमरे यांनी केली. त्यांनी जिल्ह्यात चांगलं काम केलं असतं तर लोकांनी निवडून दिलं नसतं का? असा सवालही त्यांनी केला.