Sandipan Bhumare : उद्धव ठाकरेंच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली; संदीपान भूमरेंची पुन्हा टीका
आमदार संदीपान भूमरे (Sandipan Bhumare) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळे शिवसेना संपली असा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदार संदीपान भूमरे (Sandipan Bhumare) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळे शिवसेना संपली असा आरोप संदीपान भूमरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला देखील संदीपान भूमरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी मुलाखत पाहिली नाही, मात्र एकच सांगतो आम्ही वारंवार सांगितलं की सत्तेतून बाहेर पडूयात, मात्र उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकलं नाही. म्हणून आम्ही उठाव केला. नाहीतर शिवसेना संपली असती असं देखील संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे. संदीपान भूमरे आणि रमेश बोरनाळे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या अग्रदूत बंगल्यावर दाखल झाले आहेत, त्यापूर्वी भूमरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले भूमरे?
संदीपान भूमरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत, तसेच त्यांनी बंडखोरीचे देखील समर्थन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली असे भूमरे यांनी म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही अनेकदा उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडले पाहिजे, मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्हाला बाहेर पडावे लागले. म्हणून आम्ही बंड केले, नाहीतर शिवसेना संपली असती असे संदीपान भूमरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
उद्धव ठाकरेंची भाजपवरील टीका योग्यच – पटोले
दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केलेली टीका योग्यच असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक आहे, लोक उपाशी मरत आहेत. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याची टीका नान पटोले यांनी केली आहे.