विखे विरुद्ध थोरात पुन्हा सामना रंगणार, संगमनेरच्या 14 ग्रामपंचायतींमध्ये थेट लढत
संगमनेर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींमध्ये विखे विरुद्ध थोरात अशी थेट लढत होणार आहे. (Sangamner Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat)
शिर्डी : भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. काँग्रेसमध्ये असतानाही एकमेकांविरोधात उभे ठाकणारे विखे-थोरात पुन्हा आमनेसामने आले आहेत. संगमनेर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींमध्ये विखे विरुद्ध थोरात अशी थेट लढत होणार आहे. (Sangamner Gram Panchayat Election Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat)
शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या संगमनेर तालुक्यात 26 गावं आहेत. त्यापैकी 14 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांत विखे-थोरात पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. संगमनेर तालुक्यातील 94 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 90 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
दरम्यान, कोपरगाव, राहुरी, शेवगाव या तीन तालुक्यात एकही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली नाही. सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीत निवडणुका होणार आहेत. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात चुरस आहे.
कोपरगावात काय चित्र?
कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काळेंच्या ताब्यातून सत्ता हिरावून घेण्यास कोल्हे उत्सुक आहेत. कोल्हे या भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाची आहेत.
काकडी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचे 11 अर्ज आहेत, तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचेही प्रत्येकी 11 अर्ज दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त काही अपक्ष तर काही डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
काकडी गावात शिर्डी विमानतळ असल्याने मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. काकडी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून काळे गटाची सत्ता आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कोल्हे गट कसोशीने प्रयत्न करत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 300 कोटींचा निधी विमानतळ आणि गावाच्या विकासासाठी देण्याची घोषणा करुन घेतली. त्यामुळे काळेंनी सरशी घेतल्याचं बोललं जात आहे.
तनपुरे विरुद्ध कर्डिले
दुसरीकडे, राहुरीमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहुरीतील 44 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 833 उमेदवार रिंगणात आहेत.
संबंधित बातम्या :
कोपरगावातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, राष्ट्रवादीच्या आमदारासमोर विखेंच्या भाचीचं आव्हान
(Sangamner Gram Panchayat Election Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat)