सांगली : सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी आज (20 जानेवारी) पालिकेच्या महासभेत राजीनामा (sangli mayor deputy mayor resign) दिला. महापालिकेच्या आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोत आणि सूर्यवंशी यांना याआधीच राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामा दिला (sangli mayor deputy mayor resign) आहे.
राजीनामा दिल्यानंतर महापौर संगिता खोत यांना अश्रू अनावर झाले. त्या महासभेत बोलताना अचानक रडू लागल्या. संगिता खोत या भाजपच्या सांगली महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर होत्या. त्यांनी सांगली महापुरावेळी पाण्यात उतरुन काम केलं होतं. सक्षम महिला पदाधिकारी आणि स्वत:चे निर्णय घेणाऱ्या महापौर अशी संगिता खोत यांची ओळख होती.
दरम्यान सांगलीच्या महापौर आणि उपमहापौर सुर्यवंशी यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वतः फोन करुन आजच्या महापालिकेच्या महासभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंतीही केली होती. मात्र ही विनंती पक्षाने फेटाळून लावली होती.
महापौरपदासाठी अडीच वर्षांसाठी ओबीसी (OBC) महिला आरक्षण होते. मात्र भाजपने दीड वर्षातच महापौर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित काळासाठी पुन्हा ओबीसी उमेदवाराचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. भाजपनं 78 पैकी 41 जागा जिंकल्या (sangli mayor deputy mayor resign) होत्या.
सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप – 41
काँग्रेस – 15
राष्ट्रवादी – 20
इतर – 02
एकूण- 78