सांगली: सांगली महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) झालेल्या ‘कार्यक्रमाचा’ भाजपच्या नेत्यांनी प्रचंड धसका घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी सांगलीत भाजपच्या (BJP) जिल्हा परिषद (Sangli ZP) पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम बारगळला. त्यामुळे या पदांसाठी इच्छूक असलेले भाजपमधील स्थानिक नेते नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. (BJP leaders in fear due to NCP in Sangli)
या सगळ्या घडामोडीनंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून बैठका घेतल्या जात आहेत, एकमेकांना फोनाफोनी केली जात आहे. त्यामुळे आता सांगलीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सांगलीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेत (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation) सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांची निवड झाली. त्यानंतर जयंतरावांच्या अचूक नियोजनाकडे लक्ष वेधत टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपला डिवचले होते.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.
नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे.
भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे रंगत वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भाजप खबरदारी घेताना दिसत आहे. स्थायी समितीचे भाजपचे 8 सदस्य गुजरातला रवाना झाले आहेत.
संबंधित बातम्या :
सांगलीत महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर, भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल
(BJP leaders in fear due to NCP in Sangli)