Sanjay Rathore : संजय राठोड यांची नव्या मंत्रीमंडळात वर्णी?, पोहरा देवीचे महंत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात यावे यासाठी श्री क्षेत्र पोहरादेवीचे महंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी राठोड यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी ते करणार आहेत.
वाशिम: पोहरा देवीचे (Pohara Devi) महंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यासाठी मंत्रीपदाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सजंय राठोड यांना मंत्रिपद न मिळाल्यास देशभरातील लाखो बंजारा समाजाचे बांधव नाराज होतील असा इशारा देखील महंत सुनील महाराज यांनी दिला आहे. संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यास ते राज्यात बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करतील. संजय राठोड यांनी महाविकास आघाडीत मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याला आज 18 महिने झाले. अठरा महिन्यापासून बंजारा समाजाचा प्रतिनिधी मंत्रीमंडळात नाही. त्यामुळे श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थांनचा विकास देखील रखडला असल्याचे महंतांनी म्हटले आहे. पोहरादेवीच्या विकासासाठी संजय राठोड यांना मंत्री करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले महंत?
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यापासून राज्यात एकही बंजारा समाजाचा मंत्री नाही. बंजारा समाजाचा विकास झालेला नाही. त्यामुळे बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संजय राठोड यांना मंत्रीपद मिळणे आवश्यक आहे. राठोड यांना मंत्रीपद न मिळाल्यास बंजारा समाज नाराज होईल. तसेच श्री क्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी देखील संजय राठोड यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राठोड यांनी दिला होता राजीनामा
महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांना वनमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात गंभीर आरोप झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले व राज्यात शिंदे, फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. नव्या सरकारमध्ये अनेक आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. परंतु संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाला भाजपाने विरोध केला होता. महाविकास आघाडीवर दबाव वाढल्याने अखेर त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. मात्र आता सत्तेत भाजप असल्याने संजय राठोड यांना मंत्रीपद मिळणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.