Sanjay Raut : एकनाथ शिदेंच्या बंडानं राऊतांची देहबोली डाऊन, हे तीन व्हिडीओ नेमकं काय सांगतात?
एरवी आवेशात असलेले संजय राऊत आज मात्र माध्यमांशी संवाद साधताना काहीसे शांत भासले! सकाळी त्यांनी एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांची समजूत घालू असं म्हटलं. दुपारी त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण झाल्याचा आरोप केला. तर संध्याकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणाचा वापर करत भाजप दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election) पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. कारण, शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निषाण फडकावलं आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर रात्रीतूनच एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमध्ये दाखल झाले. शिंदे यांच्यासोबत शिवसनेचे 25 पेक्षा अधिक आमदार असल्यानं शिवसेनेचे धाबे दणादणले आहेत. अशावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एकूण तीन वेळा माध्यमांशी संवाद साधला. एरवी मोठ्या आवेशात असलेले संजय राऊत आज मात्र माध्यमांशी संवाद साधताना काहीसे शांत भासले! सकाळी त्यांनी एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांची समजूत घालू असं म्हटलं. दुपारी त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण झाल्याचा आरोप केला. तर संध्याकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणाचा वापर करत भाजप दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
संजय राऊतांचा सकाळी माध्यमांशी संवाद
सकाळी माध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे बाहेर असल्याचं मान्य केलं. पण भूकंप होईल असं जे वातावरण निर्माण केलं जात आहे तसं काही होणार नाही असा दावा केला. त्याचबरोबर सूरतमध्ये गेलेले अनेक आमदार संपर्कात आहेत. खुद्द एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क झाल्याचा दावा राऊत यांनी केला होता. तसंच महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा दावाही राऊत यांनी केला होता. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी फार मोठं कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर केला. यावेळी बोलताना राऊतांनी भाजपवर टीका केली. मात्र एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करु असा विश्वास व्यक्त केला होता.
दुपारी अप्रत्यक्षपणे शिंदेंवर आरोप
त्यानंतर दुपारी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळतेय. काही आमदारांनी कळवलं आहे की आमच्या जिवाला धोका आहे. इथे आमची हत्याही होऊ शकते’, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आमचे सहकाही आहेत, आमचे मित्र आहेत. अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. नक्कीच बाळासाहेब ठाकरे असतील, ते म्हणतात त्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे असतील. या सगळ्यांसोबत एकत्र काम केलं आहे. मुळात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात, असं राऊत म्हणाले होते.
‘आमदार एकदा मुंबईला आले की घरी परततील’
संध्याकाळच्या सुमारास वर्षा निवासस्थानी बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकला जातोय. एकदा का हे आमदार मुंबईत आले की घरी परत येतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला 33 आमदार उपस्थित होते. काही आमदार मुंबईला येत आहेत, काही दिल्लीत आहेत कोर्टाच्या कामासाठी असं राऊत म्हणाले.
एरवी आक्रमक असलेले राऊत आज डाऊन!
या सगळ्यात राऊत यांची देहबोली नेहमीपेक्षा काहीशी डाऊन अर्थात शांत अशी पाहायला मिळाली. एरवी भाजपवर टीका करताना संजय राऊत अधिक आक्रमकपणे बोलतात. भाजपला थेट इशारा द्यायला ते कधीच मागेपुढे पाहत नाहीत. पण आज शिंदे यांच्या बंडानंतर मात्र राऊतांचा तो आक्रमकपणा जाणवला नाही.