मी ‘सामना’त नसताना पोलीस घुसले, साक्षीदारांना धमकावलं, आधीच प्रिंट केलेल्या कागदांवर सह्या घेतल्या, संजय राऊतांचे गंभीर आरोप
मी माहिती दिली आहे. माझ्याकडेही जबाबासाठी आले होते. मी सामनात नसताना अनेकांना धमकी दिली. जबाबासाठी दबाव आणला. तुम्ही हे सगळं पाहत आहात, असं संजय राऊत म्हणालेत.
मुंबईः माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती मी पोलीस आयुक्तांना दिली असताना, या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याचं काम पोलिस करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात मी नसताना तपासाच्या नावाखाली पोलीस घुसले. त्यांनी साक्षीदारांना धमकावलं. आधीच प्रिंट करून आणलेल्या मजकूरावर साक्षीदारांच्या सह्या घेतल्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रचंड दबाव आहे. या मालिकेत आता आणखी काय काय घडतंय, हे पाहा असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ गुंडांचं सरकार आहे. खोकेवाल्यांचं सरकार आहे. साक्षीदारावर दबाव आहे. माझ्या माघारी सामना कार्यालयात जाऊन साक्षीदाराला धमकी देण्याची चर्चा सुरु होती. हे होणारच. एक गुंड खुलेआम मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभे राहून धमकी देतो. त्यांच्या बंगल्यावरही जातो. त्यांच्या खासदार पुत्रासोबत दिसतो. त्याला पोलीसाचंही समर्थन मिळतं. पोलीस त्याला संरक्षण देतात. ही कोणती कायदा व्यवस्था आहे. मी माहिती दिली आहे. माझ्याकडेही जबाबासाठी आले होते. मी सामनात नसताना अनेकांना धमकी दिली. जबाबासाठी दबाव आणला. तुम्ही हे सगळं पाहत आहात.
‘खोक्यांखाली फडणवीस चिरडलेत’
या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहात का, याविषयी संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, त्याची गरज नाही. तेसुद्धा खोक्यांखाली चिरडून काम करतायत. ४० खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत….
काय आहे नेमकं प्रकरण?
बुधवारी संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ल्याची सुपारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केलाय. यासंबंधीची पक्की माहिती मला मिळाली असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यानंतर पोलीसांनी संजय राऊत यांचा जबाब नोंदवला. तसेच सामना वृत्तपत्राच्या कार्यालयातील व्यक्तींचाही जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
मी तसं म्हटलं नव्हतं…
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी काल एका ट्विटद्वारे संजय राऊत यांचा भांडाफोड झाल्याचं वक्तव्य केलंय. सामनामधील काम करत असलेल्या व्यक्तीने जबाबात ‘मी तसं म्हटलं नव्हतं’ असं सांगितल्याचं म्हटलं आहे. ठराविक असे कोणत्याही आमदार, खासदारांचं नाव घेऊन ते राऊतांवर हल्ला करणार असल्याचं मी सांगितलेलं नाही, असं जबाबात म्हटल्याचं एक डॉक्युमेंट नरेश म्हस्के यांनी ट्विट केलं होतं.
‘हेच डॉक्युमेंट खरे का?’
मात्र सामनातील व्यक्तीवर दबाव आणून सदर जबाब फिरवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मी नाशिक दौऱ्यावर असताना पोलीस सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले आणि तेथील लोकांवर दबाव आणला. आधीच प्रिंट करून आणलेले कागद हवेत दाखवले आणि त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे हे डॉक्युमेंटदेखील बनावट आहेत, ते खरे मानले तरीही ते दबावाखाली तयार केले असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.