‘भारतरत्न’साठी विरोध करणारे कोणीही असो, त्यांना सावरकरांच्याच कोठडीत दोन-दोन दिवस ठेवा : संजय राऊत
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा राजकीय प्रयोग करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका विरोधाभासी येत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरही असाच संघर्ष पाहायला मिळत आहे (Savarkar Bharatratn issue).
मुंबई : महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा राजकीय प्रयोग करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका विरोधाभासी येत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरही असाच संघर्ष पाहायला मिळत आहे (Savarkar Bharatratn issue). काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केल्यानंतर यावर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जे सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करत आहेत, ते कुणीही असो त्यांना अंदमान तुरुंगातील सावरकरांच्याच कोठडीत दोन दिवस ठेवावे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं (Savarkar Bharatratn issue).
संजय राऊत म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी काय केलं होतं हे आम्हाला कुणी सांगू नये. पृथ्वाराज चव्हाण काँग्रेसचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, भारतरत्न देण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाकडून घेण्यात येतो. सावरकरांचा सन्मान व्हावा ही आमची नेहमीच मागणी राहिली आहे. जर कुणी विरोध करत असेल, तर ती त्यांची भूमिका असेल. अशी भूमिका असू शकते. मात्र, पृथ्वाराज चव्हाण यांना सावरकरांनी केलेल्या मोठ्या त्यागाबद्दल आणि संघर्षाबद्दल कल्पना आहे.”
सावरकरांनी आयुष्याची 14 वर्षे अंदमानच्या तुरुंगात घातली. ही असामान्य गोष्ट या देशात घडली आहे. त्यांना त्यावेळी 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यावेळी त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. नंतर ते बाहेर आले. जे लोक त्यांना भारतरत्न देण्यासाठी विरोध करतात, ते कुणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारसरणीचे असो या सर्वांना दोन दोन दिवस अंदमान तुरुंगात सावरकरांच्याच कोठडीत ठेवायला पाहिजे. मग त्यांना सावरकरांनी देशासाठी किती त्याग केला, संघर्ष केला आणि बलिदान दिलं हे कळेल, असं संजय राऊत म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण सावरकरांवर काय म्हणाले?
दरम्यान, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती हा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही. त्यामुळे असं असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास आमचा त्याला विरोध असेल. सावरकर यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं आणि विवादास्पद होतं. त्यांच्याबद्दल चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी बोलल्या जातात. काँग्रेसला सावरकरांची जी गोष्ट चुकीची वाटते ती आम्ही बोलत राहू.”
“सावरकरांनी इंग्रजांसोबत काम केलं, त्यांना इंग्रजांकडून पेन्शनही मिळाली”
पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांनी इंग्रजांना मदत करत त्यांच्यासोबत काम केल्याचा आणि त्यांना इंग्रजांची पेन्शन मिळाल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “सावरकर हे एक गुंतागुंतीचं आणि विवादास्पद व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ते तुरुंगात होते हे खरं आहे. मात्र, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली हेही खरं आहे. ते एकप्रकारे इंग्रजांसोबत हात मिळवणी करुन काम करत होते. त्यामुळेच त्यांना 60 रुपये पेन्शन देखील देण्यात आली होती. मला वाटतं इतिहासातील कोणत्याही व्यक्तीचं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ विश्लेषण करता येत नाही. कोणत्याही काँग्रेसी नेत्याला विचारलं तर त्यांच्या मनात आजही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात जीवाची बाजी लावण्याची गोष्ट आहे. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी फाशीच्या शिक्षेलाही आनंदाने स्वीकारलं होतं.”