माजी मुख्यमंत्र्यांविषयी काही विचारु नका, सत्ताकेंद्र ‘मातोश्री’च : संजय राऊत
मला माजी मुख्यमंत्र्यांबद्दल काही माहित नाही. बाळासाहेबांविषयी श्रद्धा असलेले नेते, कार्यकर्ते नेहमी इथे येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहत असतात, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : माजी मुख्यमंत्र्यांबद्दल मला काही माहित नाही, बाळासाहेबांविषयी श्रद्धा असलेले नेते नेहमी इथे येऊन आदरांजली वाहत असतात, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी राऊतांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन (Sanjay Raut at Balasaheb Thackeray Memorial) केलं.
‘बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल, जे आजवर झालं नाही ते सर्व महाराष्ट्रात होईल, क्रांती होईल, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकणार’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत दिल्लीला जाण्यासाठी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाहून रवाना झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस तिथे दाखल झाले.
‘मला माजी मुख्यमंत्र्यांबद्दल काही माहित नाही. बाळासाहेबांविषयी श्रद्धा असलेले नेते, कार्यकर्ते नेहमी इथे येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहत असतात. गेल्या वर्षी ते (फडणवीस) आले होते. सगळ्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी सद्भावना आहेत.’ असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ कोण?
‘कोणताही निर्णय थांबलेला नाही. निर्णयाचा क्षण जवळ येत आहे. महाराष्ट्रात आम्हाला स्थिर सरकार द्यायचं आहे. यावर आम्ही सगळे मिळून काम करत आहोत. किमान सामायिक कार्यक्रम जवळपास निश्चित झाला आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, त्या आम्ही पूर्ण करु’ असं राऊतांनी स्पष्ट केलं.
‘माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार मुंबईत नाहीत. ते सरकार स्थापनेसंदर्भात पुण्यात काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार नेहमी बाळासाहेबांच्या जवळचे राहिले आहेत, त्यांनी नेहमी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे’ असं संजय राऊत म्हणाले.
सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीला शिफ्ट होणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. ‘यापुढे सत्तास्थापनेचं आणि महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र ‘मातोश्री’ असेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हा सर्व गोष्टी समोर येतील, असं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं.
‘स्वाभिमान आणि हिंदूत्व या गोष्टीची चाड असल्यामुळेच शिवसेना गेल्या 50-55 वर्षांपासून महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात ठामपणे उभी आहे. स्वाभिमान आणि हिंदूत्व हा आमचा पाया आणि कळस आहे आणि राहील.’ असं उत्तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटला (Sanjay Raut at Balasaheb Thackeray Memorial) दिलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी याआधी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं होतं. त्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. भाजप नेत्यांनी ठाकरे कुटुंब किंवा संजय राऊत यांची भेट टाळत स्मृतिस्थळी हजेरी लावल्याचं दिसलं.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, असं याआधी छगन भुजबळ म्हणाले होते. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं.