आणीबाणीपासून अयोध्येपर्यंत आणि काश्मीरपासून गोध्रापर्यंत आंदोलने केल्यानेच तुम्ही सत्तेच्या तख्तावर, राऊतांनी सुनावले
आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या आंदोलनाची आठवण करुन देत आंदोलनाचं महत्त सांगितलंय. | Sanjay Raut Saamana Rokhthok
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बोलत असताना आंदोलनजीवी म्हणत त्यांचा एकप्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यापासून विरोधक त्यांच्या आंदोलनजीवी या शब्दावर तुटून पडलेत. आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या आंदोलनाची आठवण करुन देत तुमच्या दिल्लीच्या तख्तावर बसण्याचं कारण आंदोलनचं आहे, अशा शब्दात सुनावलं आहे. (Sanjay Raut Attacked Modi Govt Through Saamana Rokhtokh)
…तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो!
पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो!
ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते…!
ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱया कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा आहे.
गोध्राकांड काय होते?
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे. ज्यांना आज शेतकऱ्यांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तपासायला हवा.
गांधी, आंबेडकर, महात्मा फुले, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला काय म्हणणार?
देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱयांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’ होते. संसदेच्या आवारात अनेक पुतळे विराजमान आहेत. त्या प्रत्येक पुतळ्याला आंदोलनाचा इतिहास आहे. तो प्रत्येक पुतळा आता जिवंत होऊन सांगत आहे, ‘आम्ही आंदोलने केली म्हणून तुम्ही सिंहासनावर बसला आहात.’
महात्मा फुलेंचा पुतळा संसदेच्या आवारात आहे. स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची ठिणगी टाकणारे फुलेच होते. फुले जातीभेदाविरुद्ध लढले. आपल्या वाड्यातील विहीर त्यांनी त्या काळात अस्पृश्यांसाठी खुली केली. हे आंदोलनही मग ‘परजीवी’ वगैरे म्हणायचे काय? गाझीपूरमधील शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे ‘तमाशा’ असे भाजपचे महाराष्ट्रातील शेतकरी पुढारी पाशा पटेल यांनी बोलावे हे धक्कादायक. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘जेथे लोकांच्या म्हणण्याला मान मिळतो तो देश स्वतंत्र. जेथे नाही तो परतंत्र.’ त्या अर्थाने आज येथे कोणी स्वतंत्र आहे काय?
सत्याग्रह हा भारताने जगापुढे ठेवलेला बंदुकीला वैशिष्ट्यपूर्ण पर्याय
सत्याग्रह हा भारताने जगापुढे ठेवलेला बंदुकीला वैशिष्ट्यपूर्ण पर्याय असल्याचे राम मनोहर लोहियांनी सांगितले. त्या लोहियांचा पुतळाही संसद भवनात आहे. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरुद्ध दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा पुकारला. त्याच आंदोलनाने इंदिरा गांधींची सत्ता उलथवून टाकली. हे आंदोलन परजीवी होते काय?
स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाजप कुठेच नव्हता
एकेकाळी काँग्रेस पक्ष हेच एक आंदोलन होते. आज काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसचा इतिहास जितका आंदोलनाचा आणि संघर्षाचा आहे तितका तर भाजपचा नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनांत भाजप कुठेच नव्हता. आंदोलन म्हणजे लोकशाहीतील सूर्यकिरणे आहेत. देश त्यामुळे जिवंत राहतो. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जी आंदोलने केली त्यांना काय म्हणावे?
आपल्या देशात हेच सुरू आहे काय?
भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल. कश्मीरातून 370 कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले. क्रांतिकारक सत्तेवर येताच सगळय़ात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो. आपल्या देशात हेच सुरू आहे काय…?
(Sanjay Raut Attacked Modi Govt Through Saamana Rokhtokh)
हे ही वाचा :
पूजाने आत्महत्या केली की गॅलरीतून ढकलले?; मद्याच्या बाटल्यांनी गुंता वाढला
पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; गोपीचंद पडळकरांचा अजितदादांवर पलटवार