लोकसभा अध्यक्षपदावरून दिल्लीत मोठी खेळी?, चंद्राबाबूंना इंडिया आघाडीकडून रेड कार्पेट?
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी सरकार स्थापन झालं आहे. या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचाही समावेश झाला आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना केंद्रात मंत्रीपदेही मिळाली आहेत. आता लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपने लोकसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर चंद्राबाबू यांनीही या पदाचा आग्रह धरला आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदासाठीची जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीला लोकसभेचं अध्यक्षपद हवं आहे. तर भाजपने लोकसभा अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एनडीएमध्ये लोकसभा अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान करून सर्वांचीच झोपमोड केली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडूंकडून प्रस्ताव आला तर त्याचा विचार इंडिया आघाडी विचार करेल, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानानंतर दिल्लीची राजकीय हवा तापण्याची शक्यता आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याकडून जर लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडे प्रस्ताव आला तर आम्ही एकत्र बसू. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी हे एकत्र बसून निर्णय घेतील. लढाईची संधी मिळते तर सोडणार नाही. तेलुगू देसमने वेगळा मार्ग निवडला तर इंडिया आघाडीत चर्चा होईल, असं सांगतानाच राहुल गांधी म्हणाले, आम्ही शांत बसलो नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा सरकार पाडू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
त्यांच्या नेत्याचा पराभव केलाय
यावेळी संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. बावनकुळे यांना कुणाला नेता मानायचं आणि कुणाला नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्या नेत्याचा लोकसभा निवडणुकीत दारुन पराभव महाविकास आघाडीने केला आहे. स्वतः बावनकुळे ज्या मतदारसंघात राहिलेले आमदार आहेत, त्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार 25 हजार मतांनी पुढे आहेत, बावनकुळे यांनी जरा त्यांच्या मतदारसंघाचं ऑडिट करावं, असा चिमटा राऊत यांनी काढला. देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, असं बावनकुळे म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी हा टोला हाणला.
वारकरी विकत घेण्याचा प्रयत्न
वारीच्या निधीवरूनही राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे, व्यसन आहे. मतं विकत घ्यायची, सत्ता, आमदार, खासदार विकत घ्यायचे, माणस विकत घ्यायचे, सर्व पैसे चोरीचे आहेत. पण त्या चोरीच्या पैशातून महाराष्ट्रात असलेल्या वारकरी संप्रदायाला देखील विकत घेण्याचा काल प्रयत्न झाला आहे. आतापर्यंत कुठल्या वारकऱ्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले होते का? ही परंपरा संस्कृती हजारो वर्षांची आहे, असं ते म्हणाले.
वक्फ बोर्डाला 10 कोटी दिले. यावरून तुमच्यावर टीका झाली. त्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहात. वारकऱ्यांनी तुमचं अनुदान आणि बिदागी धुडकावून लावली आहे. त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाच कौतुक कराव तेवढं थोडंच आहे. निवडणुकांमध्ये प्रचंड पैसे वाटप झाले, अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले आणि मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला. वारकरी अशा कोणत्याही मोहापासून लांब राहिले, असंही त्यांनी म्हटलंय.