Sanjay Raut : नवा संसार सुखाने करा; राऊतांच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा
संजय राऊत यांनी देखील नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवा संसार सुखाने करा असे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
मुंबई : शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना नवा संसार सुखाने करा असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सोईनुसार राजकारण झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा, नवा संसार सुखाने करा. आम्ही सरकारमध्ये अडथळे निर्माण करणार नसल्याचेही यावेळी राऊत म्हणालेत. दरम्यान शिवसेनेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, जीथे ठाकरे तिथे शिवसेना असणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस नाराज आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांशी बोलल्याशिवाय ते कळणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत आज ईडीसोमर हजर होणार
राऊत आज दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. राऊत यांनी जमीन घोटाळाप्रकरणात ईडीच्या वतीने समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत हे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार आहेत. राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘आज मी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. काळजी करू नका’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
शिवसेनेची पुन्हा न्यायालयात धाव
राज्यात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. गुरुवारी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता नव्या सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नव्या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आता याविरोधात शिवसेना कोर्टात जाणार आहे.