दोन मुख्यमंत्री रस्त्यात भेटले, सीमाप्रश्नावर बोलले… श्राद्ध उरकल्यासारखं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊत यांचा सवाल
सीमाप्रश्नासाठी 55-60 वर्षांपासून जे लोक लढतायत, शहीद होतायत, तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्यासारखं दोन मिनिटात आटोपता? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.
नवी दिल्लीः महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली.. हा प्रश्न एवढ्या हलक्यात घेण्यासारखा आहे का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावा, असं राऊत म्हणाले.
तर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी माफीचं पत्र लिहिलं ते जनतेला नव्हे तर त्यांच्या राजकीय बॉसला अशी टीका संजय राऊत यांनी केली. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
संजय राऊत म्हणाले, ‘ पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि गृहमंत्रालयाचा संपर्क जास्त होता. राष्ट्रपतींचे एजंट असले तरी ते गृहमंत्रालयाला अधीन आहेत.. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांसदर्भात गृहमंत्रालय असतं. त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुखाला पत्र लिहिण्यापेक्षा राजकीय बॉसला पत्र लिहिलेलं दिसतंय…
आज पुण्यात बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण कार्य पुणे आणि रायगडातून गेलंय. या बंदची दखल केंद्र, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी…
या बंदचं लोण पसरत गेलं तर हळू हळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल. 18तारखेला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. महाराष्ट्रातील दैवतांचा अपमान होतोय, त्याची दखल केंद्राला घ्यावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चिघळले असताना अहमदाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट झाली. या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. या भेटीच्या पद्धतीवरून संजय राऊत यांनी टीका केली.
ते म्हणाले दोन मुख्यमंत्री सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर रस्त्यात बोलतात. जाता-जाता, सहज भेटतात आणि बोलतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे.
या सीमाप्रश्नासाठी 55-60 वर्षांपासून जे लोक लढतायत, शहीद होतायत, तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्यासारखं दोन मिनिटात आटोपता? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला सातत्याने हल्ले करतायत, धक्के देतायत.. पण आपले मुख्यमंत्री या मुद्द्यावर रस्त्यात बोलतात, हा जनतेचा अपमान आहे, याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.