सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का? संजय राऊत यांचा सवाल, म्हणाले उद्धव ठाकरे हेच सरकार!
महाराष्ट्राच्या राजकारणावर तीव्र टीका करताना संजय राऊत म्हणाले, ' महाराष्ट्रात जे चाललंय, त्याबद्दल संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे?
मुंबईः राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) सोलापूर-सांगली खेचून नेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिवून बसलंय आणि भाजपाचे (BJP) महाप्रचारक महिलांविषयी बोलतात तरी सरकार गप्प बसलंय. त्यामुळे या सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. प्रसार माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं. बुलढाणा इथं आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा आहे. येथे आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करतील, याचीही माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली.
संजय राऊत म्हणाले, ठाकरे हेच खरं सरकार आहे. आम्ही सगळे आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांशी संवाद साधायला जात आहोत. बुलढाण्यात जाहीर सभा आहे. उद्धव ठाकरे अनेक विषयांवर भूमिका व्यक्त करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेलं अपमानास्पद वक्तव्य असेल… या सगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल.
या मोहीमेत अनेक विरोधी पक्षांचा पाठींबा आम्हाला मिळतोय. भारतीय जयहिंद पार्टीनेही कालच आम्हाला पाठींबा जाहीर केल्याचं संजय राऊत म्हणाले.
महिलांबाबत लज्जास्पद विधान केल्यावर अमृता वहिनी गप्प कशा बसल्या. बोलणाऱ्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे एका बाजूला महिलांबाबत सक्षमीकरणाचे कायदे करायचे आणि दुसरीकडे यावर मूग गिळून का गप्प बसले, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या संदर्भाने संजय राऊत यांनी ही टीका केली.
महाराष्ट्राच्या राजकारणावर तीव्र टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात जे चाललंय, त्याबद्दल संतप्त वातावरण आहे. सरकार आहे कुठे? आज बुलढाण्यात आम्ही जनतेसमोर बोलणार आहेत. छत्रपती शिवरायांसारखा वीरपुरुष ज्या मातेनं दिला, त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमीत आजची सभा आहे. त्या भूमीत फक्त निष्ठा आणि इमान याचंच बीज आहे.. तिथे बेईमानांना थारा नाही. अशा विदर्भ आणि मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी विराट सभा आयोजित करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं.