सूर्यावर थुंकणारे व्यासपीठावरती, अन् पंतप्रधान 11 ताऱ्यांच्या गप्पा मारतात, संजय राऊत यांचा हल्लाबोल
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या फलकांवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चौथ्या क्रमांकावर होता. ही सरकारची बेफिकिरी आहे, जनतेच्या ती लक्षात आली, अशी टीका राऊत यांनी केली.
मुंबईः महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या अशा 11 ताऱ्यांचा उल्लेख केला. पण पंतप्रधानांच्या 11 ताऱ्यांपैकी महत्त्वाच्या ताऱ्यांचा अपमान होतोय, त्यावर कुणीच काही बोलत नाही, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. सूर्यावर थुंकणारे व्यासपीठावर बसले असताना, हे तिथे कसे बसू शकतात, असा सवाल राऊत यांनी केला. कर्नाटक (Karnataka) सीमाप्रश्नावर पंतप्रधान काहीतरी बोलतील, मुख्यमंत्री काही बोलतील, यासाठी महाराष्ट्र कानात प्राण एकवटून बसला होता, पण हे ओशाळलेपणाने तिथे दिसून आले, अशी खंत राऊत यांनी बोलून दाखवली.
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्राला विकासाचे 11 तारे आम्ही देतोयत, असं पंतप्रधान म्हणाले. त्यातला पहिले दोन तारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हे आहेत. त्या दोन्ही ताऱ्यांचा अवमान झालाय. छत्रपती शिवाजी महाराज हे तारे नाहीतच. ते प्रखर सूर्य आहेत. त्या सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते. ताऱ्यांच्या कशाला गप्पा मारतायत? आम्हाला वाटलं, राज्याचे मुख्यमंत्री चिंतामणराव देशमुखांप्रमाणे पंतप्रधानांना विचारतील… की महाराष्ट्राचा अपमान करणारे व्यक्ती व्यासपीठावर असताना तुम्ही कसे आलात? असा सवाल राऊत यांनी केला.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली. ती थाप बहुधा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडल्याबद्दलची शाबासकी असावी अशी टीका राऊत यांनी केली. किंवा जे औरंगजेबाला जमलं नाही, जे आम्हाला जमलं नाही, तो तुम्ही खंजीर खुपसून दाखवला, त्याबद्दल ही थाप होती का? असे प्रश्न जनतेच्या मनात आहे, असं राऊत म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या फलकांवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चौथ्या क्रमांकावर होता. ही सरकारची बेफिकिरी आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमान, अभिमान, शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या महाराष्ट्राच्या नशीबी हे काय आलंय? असा सवाल राऊत यांनी केला.
कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे मंत्री पंतप्रधानांना काहीतरी बोलतील, यासाठी अवघा महाराष्ट्र कानात प्राण आणून बोलत होता, पण ते ओशाळवाणे पणाने उभे होते, असं लक्षात आलं. त्यामुळे आज कर्नाटकचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेटत असतील तर मला आक्षेप घेता येणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.