सत्तासंघर्षाची नव्हे ही चोर, डाकू आणि केंद्रातल्या सरकारांविरुद्धची लढाई, संजय राऊत यांचा घणाघात
शिवगर्जना यात्रेतून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, अशी माहिती संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेली ही सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) नव्हे तर चोर, डाकू आणि केंद्रातल्या सरदारांविरोधातील लढाी आहे. ही सत्याची आणि न्यायाची लढाई आहे. ती सुरुच राहील. जनता आमच्या पाठीशी आहे, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना अनेक प्रकारांनी त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्यासमोर आम्ही झुकणार नाहीत. त्यांचे आमदार-खासदार काय साधू संत आहेत की हिमालयातून येऊन थेट मंत्रालयात बसतात, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आज ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानाचीही माहिती यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.
संजय राऊत काय म्हणाले?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ हा सत्ता संघर्ष नव्हे ही चोरांबरोबरची लढाई आहे. यांना त्याच मार्गानं बोलवावं लागेल. ज्या पद्धतीने केंद्रीय सत्ता आणि आयोगाने बळ आहे. चोर, डाकू आणि केंद्राले सरदार यांच्याविरोधात लढा आहे. तो चालूच राहिल. सत्याची आणि न्यायाची लढाई आहे. खऱ्या शिवसैनिकांची लढाई आहे. बोगस नाही तर आम्ही ओरिजनल शिवसैनिक आहोत, अशा शब्दात राऊत यांनी बोचरी टीका केली.
तुमचे लोक थेट हिमालयातून येतात का?
भाजपची देशात दडपशाही सुरु आहे. लोकशाहीतील यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, ‘ही लोकशाही नाही. अलोकशाही पद्धतीने हा देश चालतोय. फक्त विरोधी असल्याने लोकांना त्रास दिला जातोय. तुमच्या पक्षात काय फक्त साधू आहेत का? की दररोज हिमालयातून येतात आणि मंत्रालयात बसतात. तुमचे आमदार, खासदार .. ज्यांनी एलआयसी, स्टेट बँकेला लूटलं. त्यांना हात लावायची हिंमत नाही. दोन दिवस सीबीआय द्या.. म्हटलं तर ती मनातली भडास आहे. या यंत्रणेचा गैरवापर केला जातोय. आम्ही त्यांच्या १०० लोकांची नावं देऊ शकतो. कुणावरच कारवाई नाही. राहुल गांधी वगैरे सगळेच अनेक प्रकऱणं उचलून धरतात. पण कुणावरच कारवाई होत नाही.
चहापानाला जाणं का टाळलं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे आयोजित चहा पानाच्या कार्यक्रमावर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला. यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ सरकारवर अपात्रतेची तलवार आहे. सरकार कधीही कोसळेल. निवडणूक आयोगाला विकत घेतलंय. सरकार टिकवण्यासाठी २ हजार कोटींचं पॅकेज खर्च झालं आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाणं हा महाराष्ट्र द्रोहच आहे. त्याला गेले नाही म्हणून विरोधी पक्षाला देशद्रोही ठरवण्याचं काम मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचा कायद्याचा अभ्यास कच्चा आहे.
दिल्ली घोटाळ्याशी महाराष्ट्र कनेक्शन?
दिल्लीतील कथित मद्यविक्री धोरण घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन असू शकते, असा संशय असल्याचं सूतोवाच भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं. यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ आशिष शेलार म्हणजे कायदा नाही. हवेत बार उडवण्याची टोळी निर्माण केली आहे. त्याचं नेतृत्व हवाबाज, पोपटलाल करत आहेत. तुम्ही गेल्या ६ महिन्यातलं बोला. नगरविकास खात्यासंदर्भात शेलार यांनी एक याचिका केली आहे. त्या घोटाळेबाजांच्या नेतृत्वात हे काम करत आहेत. ८० कोटींचे भूकंप २ कोटींना कुणी दिले, हे शेलार यांनी सांगावं. ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. पण मांडीखाली काय घेऊन बसलेत हे माहिती नाही.