राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना का नाही?: संजय राऊत
महाराष्ट्राला सह्याद्रीच बळ दिलं. का तर ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचे नेतृत्व नाही. बाळासाहेबांच्या नावाने जे तोतया निर्माण होत आहेत ते फार काळ टिकणार नाही.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुनन्हा एकदा भाष्य केलं आहे. त्यामुळे भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेलाही घेरण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. मग वीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न का देत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा सवाल केला आहे.
वीर सावरकरांनंतर एकमेव हिंदुरुदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे आम्हाला रोज सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आम्ही गेल्या 15 वर्षांपासून मागणी करत आहोत. पण अजून दिला नाही. त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? इतकंच कशाला तुम्हाला एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेब ठाकरे यांनाही पुरस्कार द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. हे आपल्याला माहीत असेल. पण बाळासाहेबांसारखा आणि वीर सावरकर सारख्या महान लोकांचा भारतरत्न किताबाने का सन्मान केला नाही? असा सवाल त्यांनी केला.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणी जागवतानाच राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांच्या जीवनातील एक मोठी घटना आहे. त्यांनी शिवसेना वाढवली आणि हिंदुत्वाचा विचार जनमाणसात पेरला. 50 वर्ष शिवसेना अनेक घाव झेलत आहे, असं त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब असताना देखील शिवसेनेच्या पाठीत घाव घातल्या गेले. त्यांच्यानंतर या दहा वर्षातही शिवसेनेच्या पाठित घाव घातले गेले. मी त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केले आहे. हे माझं भाग्य आहे. बाळासाहेब महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाच्या जनतेची नाडी ओळखणारे लोक नेते होते, असंही ते म्हणाले.
आजही आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. कोणी कितीही टीका केली तरी बाळासाहेबांच्या विचारांची जी मशाल आहे, ती फक्त निष्ठावंतांच्या हातात असू शकते. निष्ठा आणि विचार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार मानण्याचा काही लोक आव णत आहेत. हे सर्व ढोंग आहे आणि बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला.या महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही. ढोंगाला लाथ मारली पाहिजे, असं बाळासाहेब सतत सांगायचे. त्यांनी कधीही ढोंगाचा पुरस्कार केलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दुर्दैवाने महाराष्ट्रात काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचं भासवून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र जनता बाळासाहेबांशी निष्ठावंत आहे. बाळासाहेबांचे जे विचार होते त्यामुळे महाराष्ट्र मजबूत झाला.
महाराष्ट्राला सह्याद्रीच बळ दिलं. का तर ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचे नेतृत्व नाही. बाळासाहेबांच्या नावाने जे तोतया निर्माण होत आहेत ते फार काळ टिकणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.