संदीप राजगोळकर, नवी दिल्ली: परमबीर सिंग (parambir singh) हे स्वत: आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंतचे अनेक गुन्हे आहेत. कदाचित मनसुख हिरेन (mansukh hiren case) प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले माहीत नाही. पण आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो. आतापर्यंत हे प्रकार झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने कितीही आरोप केले आणि त्याचं कितीही भांडवल केलं तरी त्याचा उपयोग नाही, त्यांना आरोप करत राहू द्या, असा पलटवार शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. सचिन वाझेला सेवेत प्रतिनियुक्तीवर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव आणला होता, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत हे मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. आरोपी स्वत:ला वाचवण्यासाठी कुणाचेही नाव घेत असतो. आम्हीही अनेकदा पंतप्रधानांचे नाव घेत असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतलं जात होतं, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्या अटकेबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, असं त्यांनी सांगितलं.
राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सरकारमध्ये कारवाया होत असतात. आम्ही त्या कारवाया सहन करत असतो. 2024 पर्यंत या कारवाया आम्ही सहन करू, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कालच्या संसदेतील भाषणाचे कौतुक केलं. राहुल गांधी यांचे कालचे भाषण मुद्देसूद आणि रोखठोक होतं. पंतप्रधानांनी त्यांचं भाषण ऐकायला हवं होतं. विरोधी पक्षाचा प्रमुख नेता बोलत असेल तर त्यांचं भाषण ऐकण्याची संसदेची परंपरा आहे. नेहरु, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी ही परंपरा कायम ठेवली होती. पंतप्रधानांनी राहुल गांधी यांचं भाषण ऐकलं असतं तर त्यांना नवीन विषय मिळाले असते, असा चिमटा राऊत यांनी काढला.
संबंधित बातम्या: