छगन भुजबळ यांचे विठ्ठल किती?; संजय राऊत यांनी डिवचले
वेगळे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार का करू शकले नाहीत? वेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या आमदारांनी त्याची उत्तरे द्यावी, असं सांगतानाच शिंदे गटातील 17-18 लोक संपर्कात आहेत. त्यांचं काय करायचं यावर आमच्यात निर्णय होत नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.
नाशिक : अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभांना प्रत्युत्तर देणाऱ्या उत्तर सभा घेण्यात येणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार गटाला डिवचले आहे. खासकरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उत्तर क्रिया, उत्तर सभा होत राहतील. आम्ही भुजबळांचा दोनदा पराभव केला आहे. माजगाव आणि नाशिकमध्ये. गद्दारी केल्यावर त्यांना पराभवाची धूळ चाखण्याची सवय आहे. बाळासाहेबांना सोडलं तो एक विठ्ठल, शरद पवारांना सोडलं तो एक विठ्ठल. यांचे विठ्ठल किती आहेत? असा सवाल करतानाच आम्हाला एकच विठ्ठल माहीत आहे. आमचा पांडुरंग. हे विठ्ठल कसे बदलतात? विठ्ठलांच्या दरबारात भक्तांची रांग असते. पण यांच्या दरबारात विठ्ठलांची रांग आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
भुजबळ शिवसेनेत येणार होते. ही चुकीची माहिती आहे. 2014मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. तोही जाहीरपणे. 2014मध्ये आमची भाजपसोबतची युती तुटलेली होती. भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. युती तुटलेली होती. अशावेळी एखादा वेगळा पक्ष वेगळा निर्णय घेणार असेल तर त्याची चर्चा कशाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मीच गौप्यस्फोट केला
2019मध्ये भाजपने आम्हाला फसवलं. आम्ही काही राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढलो नव्हतो. त्यांना कोणाबरोबर जायचा हा त्यांचा अधिकार होता. ते जर भाजपशी त्यावेळी बोलत असतील तर तसं बोलण्याचा त्यांना अधिकार होता. ते काही गौप्यस्फोट करत नाहीये. मला शरद पवार यांनी याबाबत सांगितलं होतं. अजित पवार कुणाशी चर्चा करतात हे मीच सामनातून उघड केलं होतं. सर्वात आधी मीच गौप्यस्फोट केला आहे, असं ते म्हणाले.
तर ते नामर्द
भुजबळांच्या साडेचारशे कोटीच्या मालमत्ता जप्त आहेत. अजित पवार यांची चौकशी सुरू आहे. मुश्रीफ इथे आल्यावर त्यांना जामीन मिळालाय. एकनाथ शिंदे यांच्या मागे चौकशी सुरू आहे. प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, राहुल शेवाळे यांची चौकशी सुरू आहे. भावना गवळींवर ईडीचं वॉरंट आहे. काय सांगता? ही लोकं वळवली ती ईडीच्या धाकानेच. ही दोन शस्त्र काढली तर भाजपवाले नामार्द आहेत, असा हल्लाही त्यांनी केला.
त्यानी थांबायला हवं होतं
प्रत्येकजण पक्ष सोडतो तो स्वत:च्या व्यक्तिगत सर्वार्थासाठी. प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो. ते त्याला तात्त्विक मुलामा देतात. नीलम ताई 25 वर्ष विधान परिषदेवर आहे. उपसभापती, महिला आर्थिक महामंडळ दिलं. यापेक्षा अधिक काय देऊ शकतो? संकटाच्या काळात त्यांनी थांबायला हवं होतं. सामान्य शिवसैनिक संघर्ष करतोय. अशावेळी ज्यांना खूप काही मिळालं. त्यांनी थांबायला हवं होतं, असं ते म्हणाले.
नीलमताईंना माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर का आहे हे माहीत नाही. जाणारे जातात. त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. त्यांना काय कमी दिलं? त्यांनी पक्ष किती वाढवला? ते लोक स्वत: पुरतं पाहत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.