कोल्हापूर : राज्याच्या राजकारणा अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या कोल्हापुरात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरून बराच राजकीय गदारोळ आणि त्यांच वेळेला संजय राऊत कोल्हापुरात (Kolhapur) असल्यामुळे राजकारणाचा महोल सध्या गरमागरमीचा आहे. कालच कोल्हापुरातून संजय राऊतांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधत शाहू महाराजांच्या वक्तव्याचं कौतुक केले. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हेही कोल्हापुरात आहेत. यावेळी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भेट झाली. या भेटीवेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं, मात्र त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे संजय राऊत यांचा हात उंचावत म्हणाले आमचं ठरलंय, आमचं ठरलंय, त्यामुळे यांचं नेमकं काय ठरलंय? अशा चर्चा राजकारणात सुरू झाल्या.
संजय राऊत काल कोल्हापूरमध्ये आयोजित जाहीर सभेत म्हणाले होते की आमचं ठरलंय हे चालणार नाही, शिवसेनेशिवाय इथे काहीही ठरणार नाही. कोल्हापुरात गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आमचं ठरलंय हे जणू ब्रीदवाक्याच बनलं होतं. काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेना स्थानिक नेत्यांकडून हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळालं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्याचा फटका बसला होता. शिवसेनेचे 5 आमदार पराभूत झाले होते. त्यामुळेच कोल्हापूर उत्तर च्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे सुरूवातीला बंड करताना दिसून आले. मात्र त्यानंतर सेनेला त्यांचं बंड क्षमवण्यात यश आलं. आणि कोल्हापूर उत्तरचा गड शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या साथीने काँग्रेसने पुन्हा काबीज केला.
आता संजय राऊत हे पक्षाच्या शिवसंपर्क अभियानासाठी दोन दिवस कोल्हापूरात आहेत. शासकीय विश्रामगृह येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात होते. शासकीय विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद होती. दोन्ही नेते आपआपला कार्यक्रम आटोपून निघत असताना अचानक एकमेकांची भेट झाली. त्यानंतर आमचं ठरलंय हे वाक्य पुन्हा एकदा कोल्हापूरकर आणि महाराष्ट्राला ऐकायला मिळालं. त्यामुळेच या भेटीची सध्या राज्यभर चर्चा आहे. आता आमचं ठरलंय, या वाक्यमुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचं झालेलं डॅमेज कंट्रोल यावेळी कसं भरुन काढणार हे तर निवडणुकीनंतरच कळेल. तोपर्यंत कोल्हापुरात आमचं ठरलंय हे वाक्य गाजतच राहणार. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाने आत्तापासूनच निवडणुकांंचं वातावरण तापवलं आहे.