तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही, अंगावर येणाऱ्यांना संजय राऊतांचा सल्ला
जे माझ्या अंगावर येतात त्यांना मी सांगतो तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही. मी फाटका माणूस आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांना सल्ला दिला आहे (Sanjay Raut interview by Raju Parulekar).
मुंबई : जे माझ्या अंगावर येतात त्यांना मी सांगतो तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही. मी फाटका माणूस आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांना सल्ला दिला आहे (Sanjay Raut interview by Raju Parulekar). ते नाशिकच्या महाकवी कालिदास मंदिरात राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलखतीत बोलत आहेत. उर्जा युवा प्रतिष्ठानने या मुलाखतीचे आयोजन केले आहे. या मुलाखतीला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
संजय राऊत म्हणाले, “मी स्वतःला शिल्पकार मानत नाही. मी फाटका माणूस आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार व्हावं ही देशाची राज्याची गरज होती. लोकांच्या मनातही तेच होतं. सुरुवातीला शिवसेना बार्गेनिंग पावर वाढवत आहेत असं म्हटलं गेलं. मात्र, मला आणि शरद पवारांना याबद्दल विश्वास होता. शरद पवार यांना जास्त विश्वास होता. भाजपचा विश्वास संपला होता.”
“फोन टॅप केला तर कळेल, संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात”
शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. माझा फोन टॅप केला तर त्यांना कळेल संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात. मी ज्यांच्याविषयी बोलत होतो, तेच ऐकत असल्याने त्यांना कळलं आम्ही काही मागे हटत नाही.”
“पवारांना ईडीची नोटीस आल्यावर पहिल्यांदा डोक्यात ठिणगी”
महाराष्ट्रातील राजकारणातील बदलांची सुरुवात शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर झाल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यावरच पहिल्यांदा डोक्यात ठिणगी पडली. एकदा भीती मेली की माणूस पुढे जातो. तुरुंगात टाकायचं आणि राज्य करायचं ही आणीबाणीची परिस्थिती पुन्हा येता कामा नये, असंही राऊत यांनी नमूद केलं.
“मी कधीही मनापासून भाजपच्या जवळ गेलो नाही”
मी कधीही मनापासून भाजपच्या जवळ गेलो नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या काळातील घडामोडींवर बोलताना ते म्हणाले, “अजित पवार आदल्या दिवशी आमच्या सोबतच होते. आम्ही मांडीला मांडी लावून बसलो होतो. राज्यपाल तर झोपलेच नव्हते. बहुतेक ते रात्रभर योगा करत होते. त्यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, तरीही मी अजित पवार संध्याकाळपर्यंत परत येतील हे माध्यमांना आधीच सांगितलं होतं.”
Sanjay Raut interview by Raju Parulekar