‘संजय राऊत मोठे नेते, सरकार स्थापनेत योगदान; पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’
यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही. | Balasaheb Thorat Sanjay Raut
मुंबई: संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते संपादकही आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, तरीही संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्षपद सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडेच राहील. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले. (Congress leader Balasaheb Thorat on Sanjay Raut statement about UPA Chairperson)
ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या कथित भेटीसंदर्भातही भाष्य केले. जी भेट झालीच नाही त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अशाप्रकारचा संभ्रम निर्माण करुन उपयोग नाही. भाजपने काहीतरी अफवा पसरवू नयेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
तसेच आपण शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
‘संजय राऊत हे चंद्र, सूर्य, मंगळ कशावरही बोलू शकतात’
यूपीएच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. संजय राऊत हे चंद्र, सूर्य किंवा मंगळ अशा कोणत्याही विषयावर भाष्य करु शकतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कालप्रमाणे शरद पवार आणि अमित शाह भेटीवर भाष्य करण्यास नकार दिला. तशा गोष्टी घडल्याच तर तुम्हाला आधी कळेल, असे मी बोललो होता. परंतु, कोणत्याही शक्यता व्यक्त करण्याइतका मी मोठा माणूस नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का; नाना पटोलेंनी फटकारले
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का; नाना पटोलेंनी फटकारले
(Congress leader Balasaheb Thorat on Sanjay Raut statement about UPA Chairperson)