मुंबई: दिल्लीच्या वेशीवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांची भेट घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टोला लगावला आहे. संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसेच कधी मराठा आंदोलकांना का भेटले नाहीत, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला. (BJP leader Nilesh Rane slams Sanjay Raut)
निलेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अत्यंत शेलक्या भाषेचा वापर केला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातील आंदोलनकारी नकोत केवळ महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 2, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली.
याठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला.
शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.
शिवसेना खासदार अनिल देसाई यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. गाझीपूर बॉर्डवरवरील चित्रं दुर्देवी आणि मनाला चटका लावणारं आहे. शेतकरी बाहेर पडू नयेत म्हणून तारांची कुंपणं घातली आहेत. हा देश नेमका कुठल्या दिशेने चालला आहे हे यातून दिसून येतंय, असं सांगतानाच आपण आपल्याच देशात आहोत का? असा सवाल अनिल देसाई यांनी केला.
संबंधित बातम्या:
‘ती’ काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती: संजय राऊत
संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या
(BJP leader Nilesh Rane slams Sanjay Raut)