अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे हा तुमचा प्लॅन होता का; संजय राऊत म्हणाले…
अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. | Sanjay Raut
मुंबई: गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजभवनात पार पडलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. माझ्या लहानपणी सात आंधळे आणि हत्तीची एक गोष्ट होती. त्यानुसार अजित पवार यांच्या राजभवनातील शपथविधीविषयी लोकांना जे काय अंदाज बांधायचे आहेत, ते बांधू द्या. पण सत्य काय आहे, ते आम्हालाच ठाऊक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. (sanjay raut in shut up ya kunal interview)
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ (Shut up Ya kunal) या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यावेळी कुणाल कामराने संजय राऊत यांना गेल्यावर्षी महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्याविषयी प्रश्न विचारले.
अजित पवार यांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का, अशी विचारणा कुणाल कामरा याने केली. ही शक्यता संजय राऊत यांनी पूर्णपणे नाकारली नाही. या प्रश्नावर राऊत यांनी सूचक मौन बाळगले. अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. सत्य आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचेत ते बांधा, अशी मोघम टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
यावर कुणाल कामरा याने मग तुम्ही अजित पवार यांना पुन्हा एकदा अशाच शपथविधीसाठी राजभवनात पाठवणार का, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, आता राजभवनातील अलार्म आणि घड्याळ बदलण्यात आले आहे. त्या प्रकारानंतर राजभवनात पहाटेचा अलार्म लावणे बंद झाले, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
संबंधित बातम्या:
कंगना रानौतच म्हणाली होती ‘उखाड लो’, आम्ही केवळ तिच्या इच्छेचा मान राखला: संजय राऊत
भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत
जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा
(sanjay raut in shut up ya kunal interview)