अमित शाह यांना शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभणार नाहीत, संजय राऊत असं का म्हणतायत?
मला अटक होणार होती, हा फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशात यायचं होतं. पण त्या वेळचे मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत होते, असं संजय राऊत यांनी सुनावलंय.
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह (Amit Shah) हे शिवनेरी (Shivneri) किल्ल्यावर दर्शनासाठी येत आहेत. यावरून संजय राऊत यांनी अमित शाह यांना ठणकावून सांगितलं आहे. ते म्हणाले, अमित शाह कुठेही गेले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद त्यांना लाभणार नाहीत. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्यांनी शेवटपर्यंत अभय दिलं. त्यांचं समर्थन केलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शाह यांना सुनावलंय.
काय म्हणाले राऊत?
अमित शाह कुठेही गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभणार नाहीत. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तुम्ही शेवटपर्यंत अभय दिलंत. त्यांचं समर्थन केलंत, इतकच नव्हे तर जाता जाता त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करेल. शिवाजी महाराज यांना मानणारा समाज त्यांना पाठिंबा देईल, असा त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी जरूर यावं. शिवनेरीवर तुम्ही जरूर जा. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाला दिशा दिली, तो ज्या मातीत जन्मला, त्या मातीतून पवित्र गोष्टी घेऊन जाता आल्या तर जा, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
‘फडणवीस यांचा केवळ कांगावा’
मला अटक होणार होती, हा फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशात यायचं होतं. पण त्या वेळचे मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत होते, असं संजय राऊत यांनी सुनावलंय. आमच्यावर खोटे खटले दाखल केलेत, धाडी घालत आहात. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडत नाहीत का.. सहकाऱ्यांना असा त्रास देतात आणि तुमच्या पक्षातल्या लोकांना क्लिन चीट देतात. आमचे फोन टॅप करणाऱ्यांचे गुन्हे मागे घेता. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. मला अटक करणार होते, असा बोभाटा करायचा.. राज्याच्या विरोधा पक्षनेत्याला कुणी अटक करतं का? माजी प्रधानमंत्री नरसिंह राव, इंदिरा गांधी यांच्याकडेही लोक जबाब घ्यायला जातील. तुमच्यापर्यंत लोकांनी जायचंच नाही का? यावरून राऊत यांनी फडणवीसांना खडे बोल सुनावले.