राम मंदिराच्या पायाच्या 4 विटा शिवसेनेच्या, अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार : संजय राऊत
महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु असताना, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Ayodhya verdict ) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर विविध क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहे. सर्वांनी निकालाचं स्वागत करत, शांततेचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु असताना, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Ayodhya verdict ) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार… जय श्रीराम!!!, असं ट्विट केलं.
पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार… जय श्रीराम!!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 9, 2019
संजय राऊत यांनी आज सकाळीही पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. आज त्यांनी सत्तासंघर्षावर बोलणं टाळलं. राऊत यांनी आज अयोध्या या विषयावरच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. निकाल लागण्यापूर्वी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद
संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी न घाबरता सांगितलं होतं की बाबरी मशिद पाडण्यामागे शिवसैनिक आहेत. आजचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा अयोध्याला भेट दिली. त्यामुळे सरकार मजबूर झाले. अयोध्याचा निर्णय आपल्या बाजूने येईल. यात सरकारचा काहीही मुद्दा नाही. हा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
“अयोध्येत जे राम मंदीर बनेल. त्या राम मंदिराच्या पायाची वीट, मी कळस बोलणार नाही, कारण कळसामध्ये अनेकांचे बलिदान आहे. पण चार प्रमुख विटा रचण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी केले आहे”, असं राऊत यांनी नमूद केलं.
पहिले मंदीर फिर सरकार. शिवसेनेच्या 18 खासदारांसह आम्ही पुन्हा अयोध्येत जाणार. सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय सर्वोच्च मानला पाहिजे. देशवासियांनी त्याचा स्वीकार करावा. आज निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे तुमच्याशी नक्की बोलतील, असंही राऊत यांनी सांगितलं.
रामजन्मभूमी आंदोलन एका संघटनेचे किंवा पक्षाचे नव्हते. जे श्रेय घेत आहेत, त्यांनी त्यावेळी भाजपने जाहीरपणे सांगितलं होते की हे शिवसेनेने केलं असावा. बाबरी पडली होती तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या शिवसैनिकांचा गर्व आहेत असे सांगितले होते.
गेल्या 3 वर्षांपासून निवडणुका आल्या की राममंदीराचा मुद्दा येतो. हा राजकारणासाठी विषय नाही. उद्धव ठाकरे अयोध्येत गेल्याने यात हालचाल झाली. अयोध्येत चार प्रमुख विटा रचण्याचे काम शिवसेनेने केले आहे, कोणीही श्रेय घेण्याचे प्रयत्न करु नये, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला
उद्धव ठाकरेंनी सर्व भूमिका मांडली होती. जे काही मनामध्ये होते. जो त्यांचा संताप होता. ती त्यांनी व्यक्त केली. कालचं निवेदन ऐतिहासिक होतं. एक प्रकराचा उद्रेक मी पाहिला. शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रकार होता. उद्धव ठाकरेंचा संताप मी पाहिला, असं संजय राऊत म्हणाले.
आजचा दिवस हा राजकीय घडमोडींचा असणार नाही. उद्धव ठाकरेंनी परखड आहेत, आमच्या भाषेत चाबूक भाषेत मांडला. अशा उद्धव ठाकरे यांच्यावरुद्ध कोणही बोलले ते सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.