“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांचा शिंदेगटावर गंभीर आरोप...
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanajy Raut) यांनी शिंदेगटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. ज्या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया यंत्रणा लावणं हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून ही सुरक्षा फुटीर आमदारांसाठी वापरली जातेय, मिंदेगट लोकांशी यापेक्षा अजून किती वाईट वागणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर (Eknath Shinde) टीका केलीय.
आम्ही गट मानत नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना! शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद आहे. निर्णय घेताना दबाव असला तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र या निर्णयाची वाट पहात आहे, त्यामुळे विजय सत्याचा होणार, निकाल आमच्याच बाजूने असणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.
न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहेच, शिवाय राज्यातील जनता मतांच्या माध्यमातून आम्हाला न्याय देईल, असंही राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब यांच्या नावाबाबत भावुक झाले होते. पण बॅनरवरच्या फोटोंमध्ये बाळासाहेबांना सन्मान मिळाला नाही, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब यांचा अपमान काल झाला, असं राऊत म्हणालेत.
सीमाप्रश्नी राज्य सरकारने शेपूट घातलं आहे. काल मुख्यमंत्री ओशाळून उभे होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सामोपचाराने सुटायला हवा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी हा वाद सुरू केला. पण सीमाप्रश्न हा माणुसकीचा लढा आहे. जिंकणार तर महाराष्ट्रच!,असं राऊतांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर हल्ला करणं याच समर्थन करणार नाही,आमच्यावरही असे हल्ले झाले आहेत. त्यावेळी हे लोकं टाळ्या वाजवत होते. पण आम्ही असं करणार नाही. पण त्यांना सांगू इच्छितो की पत्रकारावर खटले दाखल करून काही होणार नाही, चिडून काही होणार नाही. संयमी भूमिका घेतली पाहिजे, असंही राऊत म्हणालेत.