शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण, संजय राऊत यांच्या शुभेच्छा की…?; राऊत म्हणाले,…
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने शिंदे गट आणि भाजपकडून या एक वर्षाच्या कामाची जंत्रीच जनतेसमोर दिली जात आहे. या वर्षभरात कशी कशी विकास कामे झाली, हे सरकार कसं गतिमान होतं याची माहिती दिली जात आहे. त्यासाठी जाहिरातीवर जाहिरातीही केल्या जात आहे. एक वर्ष पूर्ण केल्याने शिंदे सरकारवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाने शिंदे सरकारच्या एक वर्षाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर हे शिंदे सरकारचं फसवणुकीचं वर्ष असल्याचं म्हणत हल्ला चढवला आहे.
आम्ही या सरकारकडे सरकार म्हणून पाहत नाही. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झालं. ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याला एक वर्ष झालं. विश्वासघाताला एक वर्ष झालं. अनेक उचापती करून एक घटनाबाह्य सरकार राज्यात स्थापन केलं. त्या घटनाबाह्य सरकारला एक वर्ष झालं. या सरकार विषयी आमचं एवढच मत आहे. हे फसवणुकीचं एक वर्ष आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
चार मंत्री जातील
ही फसवणुकीची जयंती आहे. पुढच्या वर्षी फसवणुकीची पुण्यतिथी साजरी करू. फसवणुकीचे सेलिब्रेशन करायला दिल्लीत बसले असतील, असं सांगतानाच मंत्रिमंडळ विस्तार झाला तर चार मंत्री नक्की जातील. राज्यात विस्तार करण्याची हिंमत दाखवली तर शिंदे गटाचे चार मंत्री जातील. केंद्राच्या विस्तारात महाराष्ट्रातील केंद्रातील दोन मंत्री जातील, असा दावा राऊत यांनी केला.
हे सकसपणाचं लक्षण का?
सकस फक्त 40 आमदार झाले आहेत. 40 आमदार सोडले तर राज्यातील 11 कोटी जनतेच्या चेहऱ्यावर सकस दिसत नाही. राज्य अनेक संघर्षातून जात आहे. कायदा सुव्यवस्थेपासून बेरोजगारीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुण्यासारख्या शहरातून आणि इतर जिल्ह्यातून मुली गायब झाल्या आहेत. तरुणांवर हल्ले झाले हे सकसपणाचं लक्षण समजायचं का? महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षापासून घेतल्या नाही. निवडणुका न घेण्याची भीती हा सकसपणा का? कोट्यवधीची जाहिरातबाजी सुरू आहे. ही जाहिरातबाजी म्हणजे सरकारचा सकसपणा असेल तर नक्कीच हे सकस आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
फडणवीस अपयशी
हजारच्या आसपास मुली पुणे, ठाणे, मुंबई आणि खान्देशातून गायब झाल्या आहेत. गृहमंत्री आव्हानाची भाषा करतात. पण गृहमंत्री म्हणून त्यांची कारकिर्दी अयशस्वी ठरली आहे. या राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. राज्यात चोऱ्या, दरोडेखोरी राजरोसपणे सुरू झाल्या आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.