शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बेळगावला जाण्यासाठी आम्ही तयार- संजय राऊत
खासदार संजय राऊत यांचा कर्नाटक सरकार आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल...
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमकपणे कर्नाटक सरकार आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात कर्नाटकात जायला तयार आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.
येत्या 48 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळेल. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल. मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावं लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला गर्भित इशारा दिला. त्याला आज संजय राऊतांनी दुजोरा दिला. पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जायला तयार असल्याचं राऊत म्हणालेत.
बेळगावच्या लढ्यासाठी दिग्गजांनी आयुष्य वेचलंय. आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलंय? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा. हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला तर त्यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील, असं संजय राऊत म्हणालेत.
सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. त्यात आता कर्नाटक सरकार सोलापूर-सांगली या महाराष्ट्राच्या जागेवर दावा सांगत आहे. मुंबईवर हल्ला सुरु आहे. महाराष्ट्राचे असे तुकडे करण्यासाठी ठाकरे सरकार घालवलं का? एवढी हतबल परिस्थिती महाराष्ट्राने कधी पाहिली नाही. शिंदे सरकार डरपोक आहे हतबल आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून जनतेसोबत आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.