बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट- संजय राऊत
संजय राऊत यांचं मोठं विधान...
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीतील जत तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलंय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यावर आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशात त्यांनी एक महत्वपूर्ण विधान केलंय. बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट असल्याचं राऊत म्हणालेत.
मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचाय. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्र घाबरणारा आणि झुकणारा नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. पण बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट रचला जात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
30 मार्च 2018 ला संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर मी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बेळगावला जाणार आहे. पण कोर्टात जाताना माझ्यावर हल्ला करण्याचा कट असल्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी कर्नाटक सीमाप्रश्नी लक्ष घालावं, अन्यथा इथे रक्तपात होऊ शकतो, असंही राऊत म्हणालेत.
‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून सुरु असलेल्या दाव्या, प्रतिदाव्यांवर संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केला. त्यामुळे या सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असंही संजय राऊत म्हणालेत.