‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले; संजय राऊतांचं घणाघात
संजय राऊतांचं घणाघात, पाहा काय म्हणाले...
मुंबई :‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून सुरु असलेल्या दाव्या, प्रतिदाव्यांवर संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय.
‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केला. त्यामुळे या सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत म्हणालेत.
‘द काश्मीर फाइल्स’ 2 सिनेमा यावी अशी जेव्हा मागणी होते तेव्हा या सिनेमाचे निर्माते यावर काही बोलत नाहीत. या सिनेमाच्या कमाईतून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम काश्मीरी पंडितांच्या अनाथ बालकांना, कुटुंबियांना द्यावी, अशी मागणी होते तेव्हा निर्माते त्यावर बोलत नाहीत. हा सिनेमा केवळ एका पक्षाच्या प्रचारासाठी हा सिनेमा तयार केला गेला, असं संजय राऊत म्हणालेत.
गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं.
“आम्ही सर्वजण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराज आणि आश्चर्यचकीत झालो होतो. हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरं काही वाटलं नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे”, असं नदाव लॅपिड यांनी म्हटलंय. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय.