उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यावधी निवडणुकीच्या कामाला लागा; आता संजय राऊत म्हणतात, तयारी तर दिल्लीतूनच सुरू
आपण सर्वांनीच विचार करावा. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. ते कसं रोखता येईल. महाराष्ट्राला भगदाड पाडण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राला औद्योगिक दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना बळकटी देणारं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मध्यावधी निवडणुकीची तयारी दिल्लीतूनच सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचं राजकारण खूपच अस्थिर झालं आहे. ते इतकं की मध्यावधीची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार आहेत, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या प्रकाराबद्दलही भाष्य केलं. महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प जात आहेत. त्यावर कुणीच बोलत नाही.
एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहे? हे प्रकल्प कोण ओरबाडत आहे? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी विचार करावा आणि निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
राजकारण करण्यासाठी आणि राजकीय शत्रूत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र खचला तर राजकारण करायलाही आपण उरणार नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
आपण सर्वांनीच विचार करावा. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. ते कसं रोखता येईल. महाराष्ट्राला भगदाड पाडण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राला औद्योगिक दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे पडद्यामागे प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी काही काळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं थांबवावं. उणीदुणी काढू नये. फडणवीस यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची बैठक बोलवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
यावेळी त्यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कीर्तिकर हे ज्येष्ठ नेते आहेत. इतर लोक पक्षाला सोडून गेले. त्यापेक्षा कीर्तिकरांनी पक्ष सोडला याचं दु:ख अधिक आहे, असं सांगतानाच आता आम्ही या विषयावर अधिक बोलणार नाही. अमोल कीर्तिकरांसारखे तरुण आमच्यासोबत आहे. या तरुणांसोबतच शिवसेनेचा पुढचा प्रवाह जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.