दिनेश दुखंडे, रत्नागिरीः राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कालपासून कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर संजय राऊत यांनी त्यापूर्वीच वारिसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली. वारिसे यांची हत्या झाली. मात्र हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी तिचा तपास निःपक्षपाती होईल का, अशीच शंका आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं, त्या पेट्रोल पंप आणि त्या आजू-बाजूचे ३-४ सीसीटीव्ही एकचा वेळी बंद कसे, असा मोठा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. म्हणजेच स्थानिक पोलिसदेखील दबावाखाली काम करत असल्याची टीका राऊत यांनी केली.
वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कोकणातला तरुण पत्रकार अशा प्रकारे मारला गेला. त्याला मारण्यात आलं, हे सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. या कोकणातून महाराष्ट्राला आणि देशाला प्रमुख पत्रकार दिले. लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर कोकणातले आहेत. त्याच भूमीत एक तरुण पत्रकार, त्याच्या भूमिका कुणाला पटत नाहीत म्हणून त्याला चिरडून, गाडीखाली फरपटत मारला जातो.
पूर्वी बिहारमधील गुंडगिरीची उपमा दिली जायची. आता बिहारलाच महाराष्ट्राची उपमा दिली जाते, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ पूर्वी अशा घटना बिहारमध्ये घडत होत्या. आता बिहारला म्हटलं जातंय, तुमचा महाराष्ट्र झालाय का? ही हत्या साधी नाही. लोक ठरवत असतात, काय हवंय, काय नको. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार मारला जातो. त्यामागे कोण आहे, याचा तपास करावा.. हा तपास स्वतंत्रपणे निःपक्षपाती होईल का ही आजही शंका आहे.यात राजकीय षडयंत्र आहे. शशिकांत हा रिफायनरीच्या विरोधात सातत्याने लिहित होता. त्यातून ही हत्या झाली आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय.